२० वर्षापासून जोपासलेली फळबाग पाण्याअभावी होरपळली
मनोज गव्हाणे
नेकनूर (जि. बीड) : वीस वर्षांपासून जोपासलेली ४०० झाडांची फळबाग पाण्याअभावी होरपळली आहे. मांजरसुंबा-केज रस्त्यावर असलेली २० वर्षांपासूनची चमेली आणि उमरान बोरांची २०० झाडांची बाग यावर्षी पाणीटंचाईने वाळली आहेत. त्याचबरोबर ३ वर्षांपूर्वी लागवड केलेले दोनशे सीताफळांची झाडेही वाळली आहेत. शेतात बोअरवेल सुरु नसल्याने कंपनीने विमा उतरविला नाही, यामुळे एवढ्या मोठ्या झाडांचे नुकसान झाले आहे. फळबागा शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
फळबागा उभा करणाऱ्या शेतकऱ्यांना जाचक अटीने विम्याला मुकावे लागले. नोव्हेंबर, डिसेंबरच्या दिवाळी सुट्ट्यात केज रस्त्यावर असणाऱ्या सारूळ फाट्यानजीक असलेली बोरांची बाग लक्ष वेधून घेते. अनेक वाहने बोर खरेदीसाठी थांबलेली आढळतात. वीस वर्षांपासून जोपासलेली ही ढाकणे कुटुंबाची बाग यावर्षी पाणी नसल्याने होरपळून गेली आहे.
सारणीच्या तलावातून पाणी आणून ही बाग जोपासणाऱ्या अशोक शेषेराव ढाकणे (रा. सारुळ) यांनी ३ वर्षापूर्वी आणखी २०० सुपर गोल्ड सीताफळांच्या झाडांची बाग उभी केली. मात्र, ही बाग ही पाण्याअभावी होरपळली आहे. शेतात असणाऱ्या शेततळ्यात कापड खराब झाल्याने पाणी राहिले नाही. पाच एकरपेक्षा अधिक शेतातील फळबाग डोळ्यासमोर वाळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
बोरांची दोनशे आणि सीताफळ दोनशे अशी चारशे झाडे जोपासली. मात्र, यावर्षी पाण्याअभावी ती वाळली आहेत. विमा कंपनीने केवळ शेतात बोअरवेल नसल्याने विमा उतरविला नाही. यामुळे मोठे नुकसान झाले असून फळबाग जोपासणे कठीण झाले आहे. शेततळे दुरुस्तीसाठी शासनाने मदत करणे गरजेचे आहे. – अशोक ढाकणे, शेतकरी सारूळ
मराठवाड्यातील फळबागा जगविण्यासाठी सरकारी पातळीवर उपाययोजना केल्या पाहिजेत अन्यथा ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी फळबागा हे नगदी व हमखास उत्पन्न देणारे साधन आहे. कृषी उद्योगांना कच्चा माल देण्याचे काम फळबाग धारक शेतकरी करत असतात. परंतु मराठवाड्यातील सततच्या दुष्काळाची परिस्थिती आणि फळ पिकांवरील रोगराई यामुळे फळबागायतदार शेतकरी त्रस्त आहे. दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या फळबाग धारकांना शासनामार्फत आर्थिक मदत झाली पाहिजे तरच मराठवाड्यातील फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल नसता सर्व फळबागा नामशेष होतील. यामुळे मराठवाड्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल. – श्री बाजीराव ढाकणे, बीड जिल्हा प्रमुख, मराठवाडा पाणी परिषद.
हेदेखील वाचा-
बीड : नारायणगडमधील ८ जूनची ‘मराठा महासभा’ पुढे ढकलली
Parbhani News: नविन महामार्गावर बेशरमाची झाडे लावून निषेध
अखेर बारामतीत धोकादायक होर्डिंग उतरविण्यास पालिकेकडून सुरुवात..!