पणजी : वेंगुर्ला – मांडवी खाडीपात्रात म्हापशातील मुलगा बुडाला

पणजी : वेंगुर्ला – मांडवी खाडीपात्रात म्हापशातील मुलगा बुडाला

पणजी : भूषण आरोसकर वेंगुर्ला-मांडवीखाडीत पोहण्यासाठी उतरलेला मूळ दोडामार्ग मोरगाव येथील व सध्या म्हापसा येथील रहिवासी यश भरत देऊलकर याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (मंगळवार) सायंकाळी 14 रोजी घडली. यशचा मृतदेह आज पहाटे वेंगुर्लेतील मांडवी खाडीत आढळून आला. दहावीची परीक्षा देऊन तो सुट्टीनिमित्त सावंतवाडी-तळवडे येथे मामाकडे आला होता. आज त्याचा दहावी परिक्षेचा निकाल होता. त्‍या आधीच त्‍याचा असा शेवट झाल्‍याने हळहळ व्यक्‍त होत आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास यश या खाडीत बुडाला होता. सावंतवाडी तालुक्यातील तळवडा येथे आपल्या मामाकडे यश एका घरघुती कार्यक्रमासाठी आला होता. मंगळवारी १४ मे रोजी आपल्या चुलत मावशीसोबत वेंगुर्ला येथे फिरण्यासाठी गेला होता. झुलत्या पूलानजिक असलेल्या पाण्यात तो व त्याचा १५ वर्षीय चुलत भाऊ गौरव देवेंद्र राऊळ पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या दाजी बटवलकर या मच्छिमार बांधवाने गौरव राऊळ याला वाचवले. मात्र, यश हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर बुडाला.
दरम्यान, मंगळवारी दुपारपासून यशचा खाडीपात्रात शोध सुरू होता. या शोधकार्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने लाईटची व्यवस्था करण्यात आली. मध्यरात्री सुद्धा ही शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली. अखेर पहाटे ४ वाजता यशचा मृतदेह पाण्यावर दिसून आला. याबाबत वेंगुर्ला पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यश हा म्हापसा येथून १० वीची परीक्षा देऊन मामाकडे आला होता.
हेही वाचा : 

HEALTH : तुम्‍ही जेवणापूर्वी आणि नंतर चहा-काॅफी पिताय? ICMRचा सल्ला वाचाच
‘न्यूजक्लिक’ संस्‍थापकांची अटक अवैध, तत्‍काळ सुटका करण्‍याचे सर्वोच्‍च न्‍यायालयाचे आदेश 
बनावट कागदपत्रांच्या आधारे डॉक्टर झालेल्या विद्यार्थिनीला दिलासा; पदवी प्रदान करण्याचे हायकोर्टाचे आदेश