Loksabha election | शिरूरच्या मैदानात कोणाची बाजी? काय आहे अंदाज?
संतोष वळसे पाटील
मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सोमवारी (दि. 13) पार पडली. मतदानानंतर कार्यकर्त्यांमध्ये शिरूरचे मैदान कोण मारणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. महायुती व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल, याची गणिते मांडत आहेत. त्यामुळे मतदानानंतरही राजकीय वातावरण तप्त असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडली. यात पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघ हा सर्वांत चर्चेचा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (महायुती) शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (महाविकास आघाडी) डॉ. अमोल कोल्हे यांच्यात जोरदार लढत झाली.
मतदान झाल्यानंतर आता शिरूरचे मैदान कोण मारणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत आहे. मतदानानंतर दुसर्या दिवशी मंगळवारी विविध हॉटेल, टपरी, दुकान, कट्ट्यावर, पारावर, चौकाचौकात कार्यकर्ते गावागावांत झालेल्या मतदानाची आकडेवारी मांडत आहेत. प्रत्येक मतदारसंघानुसार कशाप्रकारे आघाडी मिळवत आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी गणिते मांडली जात आहेत. आमचाच उमेदवार विजयी होऊ शकतो हे सांगताना काही जण हमरीतुमरीवर येत आहेत.
बूथवर नव्हते नेहमीचे चेहरे
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सहकारात मोठी ताकद आहे. अनेक ग्रामपंचायती, सोसायटी, विविध संस्थांवर त्यांची पकड आहे. त्यामानाने गावागावात लावण्यात आलेल्या निवडणूक बूथवर गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते दिसले नाहीत. तर उमेदवार कोल्हे यांचेही काही कार्यकर्ते मतदानाच्या दोन दिवस अगोदर फारसे सक्रिय नसल्याचे दिसून आले. निवडणूक काळात दोन्ही उमेदवारांचे समर्थक घरोघरी जाऊन प्रचार करतात, मतदारांत जनजागृती करतात, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, दोन्ही उमेदवारांचे ठरावीक कार्यकर्ते सोडता मतदानासाठी लावलेल्या बूथवर कार्यकर्ते फिरकले नाहीत. त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याची चर्चा आहे.
कार्यकर्त्यांचे आरोप-प्रत्यारोप
निवडणुकीच्या प्रचारात मधल्या फळीतील कार्यकर्ते सक्रिय नव्हते असा आरोप उमेदवारांचे कट्टर समर्थक उघडपणे करीत आहेत. दोन्ही पक्षाचे उमेदवार विविध गावात मतदारांपर्यंत काही प्रमाणात पोहोचू शकले नाही. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांना मोकळे रान मिळाले व कार्यकर्ते मनापासून प्रचारात दिसले नाहीत असा आरोप कार्यकर्ते करत आहेत. गेली अनेक वर्षे विरोधात किंवा सत्तेवर असलेले कार्यकर्ते प्रचारासाठी एकाच व्यासपीठावर येत नव्हते, एकत्र प्रचार करत नव्हते. त्यामुळे उमेदवार आढळराव पाटील आणि कोल्हे यांच्या कट्टर समर्थकांनी काही कार्यकर्त्यांवर उमेदवाराचा प्रचार केला नाही, असा आरोप करत आहेत.
हेही वाचा
तडाका : निवडणूक पैजा
‘पीओके’तील अराजक
रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?