बारा दिवसांचे ट्रॅफिक जाम!

बारा दिवसांचे ट्रॅफिक जाम!

बीजिंग : भारतासारख्या गजबजलेल्या देशात ‘ट्रॅफिक जाम’ म्हणजेच वाहतुकीची कोंडी ही काही नवी बाब नाही. मात्र काही तासांनी का होईना, ही कोंडी फुटते आणि सर्व वाहने मार्गस्थ होतात. जगातील सर्वात मोठ्या ट्रॅफिक जामवेळी मात्र वाहने एकाच जागी तब्बल बारा दिवस खोळंबून राहिली होती. ही घटना घडली होती चीनमध्ये!
चीनमधील बीजिंग येथे असणार्‍या बीजिंग-तिबेट एक्स्प्रेस वे वर जवळपास 100 किमी आणि त्याहूनही अधिक अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही परिस्थिती इतकी वाईट होती की, हा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक जॅम असल्याचं सांगण्यात आलं. 14 ऑगस्ट 2010 मध्ये या महामार्गावर हे चित्र पाहायला मिळालं होतं. ही वाहतूक कोंडी इतक्या वाईट वळणावर पोहोचली होती की, इथं 12 दिवसांपर्यंत वाहनं एकाच ठिकाणी अडकून पडली होती.
बीजिंगमध्ये असणार्‍या तिबेट एक्स्प्रेस वे इथं रस्ते दुरुस्तीची कामं सुरू होती. ज्यामुळं वाहतूक एकाच मार्गानं वळवण्यात आली होती. जी अवजड वाहनं मंगोलियाहून बीजिंगपर्यंत बांधकाम साहित्य नेत होती, त्यांच्यामुळं बीजिंगबाहेर येण्याचे मार्ग बंद झाले होते. पाहता पाहता ही वाहतूक कोंडी इतकी वाढली की, परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आणि इथं पाहायला मिळालं जगातील सर्वात मोठं ट्रॅफिक जॅम. चीनमध्ये उद्भवलेली ही परिस्थिती इतकी वाईट होती की, स्थानिकांना चालण्यासाठीही जागा नव्हती.
काहींनी इथं 12 दिवस वाहनं उभी ठेवली, तर काहीजण आठवडाभर इथं अडकले होते. अनेक वाहनचालकांनी इथंच वाहनांमध्ये वास्तव्य करत काहींनी वाहनांनाच घराचं रूप दिलं होतं. काही वाहनांमध्ये जेवण बनवण्याचाही घाट घातला गेला. रस्त्याच्या कडेला असणार्‍या दुकानांमध्ये मिळणार्‍या सामानाच्या किमती पाहता पाहता इतक्या वाढल्या की, अनेकांनी लहानसहान गोष्टींसाठी दहापट अधिक रक्कम मोजली होती. इथं अडकलेल्यांकडे वाहतूक कोंडी सुटण्याची वाट पाहण्यावाचून आणखी कोणताही पर्याय उरला नव्हता.