इचलकरंजीत दहशत माजवणारा काय आहे जर्मनी गँग?
बाबासो राजमाने, इचलकरंजी
शांतताप्रिय वस्त्रनगरी अशी इचलकरंजीची ओळख. मात्र, गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या कारवायांमुळे या औद्योगिक नगरीची शांतता धोक्यात आली आहे. इचलकरंजीतील गुन्हेगारी जगतात तांबरलेल्या डोळ्याच्या जर्मनी गँगची फार मोठी दहशत आहे. सातवेळा ‘मोका’ची कारवाई करण्यात आलेली जर्मनी गँग ही महाराष्ट्रातील एकमेव गुन्हेगारी टोळी ठरली आहे. ‘नशा आणि त्यासाठी काहीही’ हाच अजेंडा या टोळीचा कायम राहिला आहे…
जर्मनी गँग म्हटल्यावर कुणालातरी वाटायचे, या गँगचे जर्मनी या देशाशी काही कनेक्शन वगैरे आहे की काय. पण तसे काहीही नाही! साधारणत: 2010 सालाच्या आसपास आदर्श जाधव या नावाचा भटक्या-विमुक्त जमातीतील एक युवक इचलकरंजी शहरानजीक असलेल्या चंदूर या छोट्याशा गावातून घरोघरी आणि गावोगावी फिरून भांड्याचा व्यापार करायचा. तो प्रामुख्याने अॅल्युमिनियमची भांडी विकायचा. पूर्वीच्या काळी आणि आजही ग्रामीण भागात अॅल्युमिनियमच्या भांड्यांना जर्मनची भांडी असेच म्हटले जाते. तर अशा प्रकारे जर्मनच्या भांड्याचा व्यापार करतो म्हणून आदर्श जाधवच्या नावाला ‘जर्मन’ हे नाव कायमचे चिकटले आणि आजकाल रेकॉर्डवर तेच त्याचे आडनाव म्हणूनही नोंदवले जाते. तर असा हा आदर्श ‘जर्मनी’ भांडी व्यापाराच्या निमित्ताने 2017 साली इचलकरंजीत आला. त्याच्या पाठोपाठ त्याचे दोन भाऊ अविनाश आणि आनंदा हे दोघेही इचलकरंजीत आले आणि खर्या अर्थाने शहरात ‘जर्मनी’ गँगचा उदय झाला.
तिघेही भाऊ मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्याच दिशेने त्यांची पावले पडायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात छोट्या-मोठ्या हाणामार्या, चोरी, वाटमारी असे करत या त्रिमूर्तीने गुन्हेगारीच्या एक एक पायर्या चढायला सुरुवात केली. हळूहळू शहरातील काही चांडाळचौकडी टोळकी यात सामील होऊ लागली आणि जर्मन गँगचा विस्तार वाढला. आज या टोळीत जवळपास दीड-दोनशे गुन्हेगार सामील असल्याची चर्चा आहे. टोळीचा जम बसल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून या टोळीने शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि काही धनिकांना लक्ष करून खंडण्या उकळायला सुरुवात केली आहे. त्याच्या जोडीला चोरी आणि वाटमार्या आहेतच. आज इचलकरंजी शहरात जवळपास 23 गुन्हेगारी टोळ्या आहेत; पण सर्वाधिक उपद्रवी म्हणून जर्मनी टोळीची नोंद आहे.
आदर्श उर्फ आद्या शेखर जर्मनी उर्फ जाधव, अविनाश शेखर जर्मनी व आनंदा शेखर जाधव उर्फ जर्मनी हे तिघे भाऊ जर्मनी गँगचे म्होरके म्हणून गेल्या काही वर्षांत पुढे आले. आदर्श जर्मनी हा या टोळीचा आद्य म्होरक्या. निव्वळ नशेबाजी आणि स्टंटबाजी करण्यासाठी कित्येक युवक आजकाल या टोळीत सामील झाल्याचे दिसतात. या टोळीच्या कारवाया मुख्यत: मध्यरात्रीनंतर सुरू होतात. अर्ध्या रात्री रस्त्यावरून निघालेल्या कुणाकडूनही नशेसाठी पैसे हिसकावून घेणे, मारहाण करणे, खुनी हल्ला ही या टोळीची खासियत आहे. त्यामुळे इचलकरंजीतील रस्त्यारस्त्यावर या टोळीची दहशत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या टोळीत अनेक मिसरुडही न फुटलेल्या युवकांचाही भरणा आहे.
2017 साली कबनूर येथे झालेल्या खुनी हल्ल्याच्या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी अविनाश जर्मनी याच्यासह सहा जणांवर पहिल्यांदा ‘मोका’ची कारवाई केली. त्यानंतर ही जर्मनी टोळी आदर्श जर्मनी हा चालवू लागला. कबनूर येथील एका खुनाच्या घटनेनंतर पुन्हा आदर्श जर्मनी याच्यासह आणखीन सहा जणांच्या टोळीवर पुन्हा दुसर्यांदा मोकाची कारवाई करण्यात आली. 2018 मध्येही या गँगचे कारनामे सुरूच राहिल्याने आनंदा जर्मनी याच्यासह पाच जणांना पोलिसांनी तिसर्यांदा ‘मोका’ लावला. मात्र ‘मोका’चा मात्रा जर्मनी गँगला लागू झाली नाही. या गँगची दहशत वाढतच गेली.
यामुळे पोलिसांनी या गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुन्हा हालचाली केल्या. शिवाजीनगर पोलिसांनी आनंदा जाधव याच्यासह आणखीन पाच जणांवर चौथ्यांदा मोका लावण्याचा प्रस्ताव दाखल केला. मात्र, त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यातच गतवर्षी शहापुरातील एका रिअल इस्टेट व्यावसायिकास रस्त्यात अडवून जर्मनी गँगने धमकावून त्याच्याकडील रोकड काढून घेतली. या गुन्ह्यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी आनंदा जर्मनी याच्यासह जर्मनी गँगच्या आणखी दोन टोळ्यांना मोका लावला.
आता सातव्यांदा या गँगमधील गुन्हेगारांना मोका लागला आहे. पण त्यामुळे या गँगच्या कारवाया थांबतील असे वाटत नाही कारण पोलिसांनी या गँगच्या एकाला आत टाकले की, त्याची जागा घ्यायला दहा जण पुढे येतात, हे वास्तव आहे. घातक शस्त्रांसह हाणामार्या आणि लुटालूट करणारी जर्मनी गँग ही आज इचलकरंची शहराला जणू काही कॅन्सरसारखी चिकटली आहे. त्यामुळे या टोळीचे एकदाचे आणि शेवटचे ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे.
48 जणांना कारागृहात धाडले
मिसरुडही न फुटलेल्या युवकांचा सहभाग असलेल्या जर्मनी गँगवर सात वेळा मोका कारवाई करत पोलिसांनी तब्बल 48 जणांना कारागृहात धाडले. त्यामुळे या गँगची चर्चा राज्यातील विशेषत: गुन्हेगारी विश्वात व पोलिस वर्तुळात आहे. जर्मनी गँगमधील चौघांनी सोन्याची अंगठी व 25 हजार रुपये धमकावून काढून घेऊन मारण्याची धमकी दिल्याने शहरातील एका 24 वर्षीय युवकाने अन्यायाबाबत स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याचेही उघडकीस आले होते. त्यामुळे या गँगची पाळेमुळे शहरात घट्ट झाल्याची दाहकता दिसून आली. या गँगचे राज्यात अन्य गँगशी अद्याप कोणतेही कनेक्शन उघड झालेले नाही. मात्र, या जर्मनी गँगची दहशत मात्र आजही शहरात कायम आहे.
26 गुन्हे दाखल
जर्मनी टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसाठी अपहरण, खंडणी वसुली, प्राणघातक शस्त्रानिशी गर्दी मारामारी, किरकोळ व गंभीर दुखापत, घरफोडी, आर्म्स अॅक्ट, चोरी असे विविध गंभीर स्वरूपाचे तब्बल 26 गुन्हे दाखल आहेत. इचलकरंजी उपविभागात आजअखेर तब्बल 23 टोळ्यांना ‘मोका’ लावण्यात आला आहे.