रत्नागिरीत नांदते 70 जणांचे एकत्र कुटुंब
दीपक कुवळेकर
रत्नागिरी : शहरातील फ्लॅट संस्कृती फोफावत चालल्यामुळे ग्रामीण भागातून एकत्रित कुटुंब पद्धती कालबाह्य होत असून, बरेचजण स्वतंत्र राहणे पसंत करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. असे असले तरी संमगेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथील शिंदे कुटुंब आजही गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. जवळपास 70 सदस्यांचे हे कुटुंब विज्ञान तंत्रज्ञानाच्या व माणुसकी हरवत चाललेल्या युगात आदर्श बनुन राहिले आहे. एकत्र कुटुंबाबरोबरच या कुटुंबाने नमन व जाखडी माध्यमातून लोककलेतील आपले वैशिष्ट्ये जोपासले आहे.
ग्रामीण भागात प्राचीन काळापासून एकत्र कुटुंबाची पद्धत
रत्नागिरीत 70 सदस्यांचे एकत्र कुटुंब
गेल्या पाच पिढ्यांपासून हे कुटुंब राहते एकत्र
ग्रामीण भागात प्राचीन काळापासून कुटुंबातील सर्वजण एकत्र गुण्या – गोविंदाने राहत असत. कुटुंबाचा कारभार हा त्या कुटुंबातील जेष्ठ व्यक्ती ‘कारभारी’ म्हणून बघत असे. हा कारभारी होण्याचा मान मोठ्या भावाला मिळत असे. याच एकीच्या जोरावर घरगाडा फक्त चालतच नसे तर पंचक्रोशीत भक्कम कौटुंबिक विकासही होत असे. तसेच या कुटुंबाचा धाकही गावासह परिसरात राहत असे. मात्र पुढे कालांतराने विज्ञानतंत्रज्ञानातील झालेल्या बदलामुळे स्वार्थी किंबहूना वैयक्तिक विकासाभोवती फिरणारी विभक्त कुटुंब पद्धत सर्वत्र आली अन् त्यांनी घरातील एकीच गिळंकृत केली. पण आत्मियता अन् पाठिंब्याचा भक्कम आधार मिळणारी एकत्र कुटुंब पद्धत आजही जिवंत ठेवण्याचे काम संगमेश्वर तालुक्यातील शिंदे कुटुंबिय करत आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून हे कुटुंब एकत्र राहत आहे.
यातील बारकु गोविंद शिंदे यांना सात मुले व दोन मुली असा परिवार आहे. या सात मुलांची मुले व परत त्या मुलांची मुलं असे 70 जणांचे कुटुंब या घरात गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. बारकु शिंदे यांच्या निधनानंतर कुटुंब प्रमुख म्हणून प्रकाश बारकु शिंदे हे जबाबदारी पार पाडत आहेत.
घर म्हटलं की वाद, तंटे आलेच. भांड्याला भांड लागणारच. मात्र तरीही एकमेकांना संभाळून घेत नाते टिकले की कुटुंब अबाधित राहते. त्याचे उत्तम उदाहरण साधत शिंदे कुटुंबिय एकमेकांचे सुख-दुःख शेअर करतात. प्रत्येकाच्या भावना, विचार जपत आधुनिकता आणि परंपरा यांचा मेळ साधत आजही ते एकत्र कुटुंब पद्धत जपत आहेत. एकत्र आणि मोठं कुटुंब असल्याने या घराला कधीच कुलुप लावावे लागत नाही. जिवंत ठेवण्याचे काम संगमेश्वर तालुक्यातील शिंदे कुटुंबिय करत आहे. गेल्या पाच पिढ्यांपासून हे कुटुंब एकत्र राहत आहे.
वर्षातून एकदा सहल, स्नेहसंमेलन अन् बक्षिसही…
शिंदे कुटुंबियातील सदस्यांकडून धावपळीच्या जीवनात काहीतरी विरंगुळा मिळवण्यासाठी दरवर्षी एकत्रित सहल व स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. दोन दिवस चालणार्या या संमेलनात संगीत, साहित्य, लोककला यावरती स्पर्धाही घेतल्या जातातच पण त्याच बरोबर कुटुंबातील उत्कृष्ठ कामगिरी करणार्यास बक्षिसही देण्याचा कार्यक्रमही उत्साहात पार पडतो.
नमन, जाखडी लोककलाही एकाच घरच्या…
सध्या लोककलाही नामषेश होण्याच्या मार्गावर आहे. मात्र यातील काही लोककला जपण्याचे कामही या शिंदे कुटुंबियांनी केले आहे. नमन व जाखडी ही कला गेली पाच पिढ्या या शिंदे कुटुंबियांनी जपली आहे. यामधील कलाकार हे घरातील आहेत. बाहेरचा एकही कलाकार या लोककलेत सहभागी नसल्याने एकाच घरचे नमन, असेही या कुटुंबाला म्हटले जाते.
जिल्ह्याच्या नावलौकीकात भर…
शिंदे कुटुंबात वयोवृद्धापासून ते लहान बाळापर्यंत सर्वजण आनंदाने एकत्र राहत असून या कुटुंबियांचा मुख्य व्यवसाय बांधकाम हा आहे. घर बांधणीचे काम सर्वजण एकदिलाने मिळून करतात. गेल्या पाच पिढ्यांपासून एकत्र राहणार्या या कुटुंबाने एकीच्या बळावर आपल्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास केला आहेच, पण सामाजिक संबंधही सलोख्याचे ठेवत अनोखा आदर्श घालून दिला आहे. जिल्ह्याला नावलौकीक मिळवून देण्यात हे कुटुंब भर घालत आहे.