Loksabha election | पुण्यात वाढलेल्या मतांचा कौल कुणाच्या बाजूने? दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा
ज्ञानेश्वर बिजले
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या द़ृष्टीने सेफ मानल्या गेलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मतदानापर्यंत येथील लढत अटीतटीची ठरली. दोन्ही बाजू विजयाचा दावा करीत असल्या, तरी गेल्या निवडणुकीपेक्षा वाढलेल्या 68 हजार 442 मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. यंदा 11 लाख 3 हजार 678 जणांनी मतदान केले, तर 2019 मध्ये 10 लाखा 35 हजार 236 मतदारांनी हक्क बजावला होता. वडगाव शेरी या सर्वांत मोठी मतदारसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात गेल्या 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत 35 हजार 648 अधिक मतदारांनी मतदान केले. पुण्यात या वेळी वाढलेल्या मतदानापैकी निम्मे मतदान वडगाव शेरीत वाढले. ते कोणाच्या पारड्यात मते टाकणार, या मतदारसंघाचा कौल ठरविण्यात ते मतदार निर्णायक ठरणार आहेत. या मतदारसंघात 2019 मध्ये गिरीश बापट यांनी 56 हजारांचे मताधिक्य घेतले होते.
तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशींनी 61 हजार, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांनी 21 हजार मते घेतली होती. येथील वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या समर्थकांपैकी अनेक जण महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहिल्याची चर्चा आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी ताकद उभी केली.
वडगाव शेरी मतदारसंघ ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहील, तो विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल. भाजपच्या द़ृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोथरूड मतदारसंघात मोहोळ यांना मिळणारे मताधिक्य त्यांच्या द़ृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या चर्चेत हा आकडा 40 हजारांपासून 80 हजारांपर्यंत जातो. कोथरूडमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा 16 हजार 929 अधिक मते नोंदविली गेली. गेल्या निवडणुकीत झालेल्या दोन लाख मतांपैकी काँग्रेसने 42 हजार मते मिळविली होती. बापट यांनी लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळविले असले, तरी त्यानंतर तीन महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते 25 हजारापर्यंत खाली घसरले होते.
कोथरूडमध्ये आगामी निवडणूक ‘भाजप विरुद्ध शिवसेना’ अशी होण्याची शक्यता असून, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) कार्यकर्ते किती मते काँग्रेसकडे वळविणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पर्वती मतदारसंघात यंदा गेल्या वेळेपेक्षा 5 हजार 884 मतांची वाढ झाली आहे. खासदार बापट यांनी पर्वतीतून 66 हजारांचे मताधिक्य मिळविले होते. त्या तुलनेत यंदा भाजपचे मताधिक्य घटेल, असा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचाच अंदाज आहे. तर, पर्वतीमध्ये धंगेकर यांना मताधिक्य मिळेल, असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा आहे. या मोठ्या तीन विधानसभा मतदारसंघांत सुमारे साडेसहा लाख मतदान झाले आहे, तर उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघात साडेचार लाख मतदारांनी मतदान केले. मोठ्या मतदारसंघांत भाजपचे वर्चस्व असले, तरी उर्वरित मतदारसंघांत काँग्रेस किती आघाडी घेणार, याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
कसबा पेठ
कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालाने राज्याचे लक्ष गेल्या वर्षी वेधून घेतले होते. हक्काचा मतदारसंघ म्हणून धंगेकर येथून मताधिक्य मिळवतील. ते रोखण्यासाठी भाजपची यंत्रणा सज्ज झाली होती. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बापट यांना केवळ बारा हजार मतांचे लीड मिळाले होते. या वेळी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान दहा हजारांनी वाढून दीड लाखापर्यंत पोहचले आहे. या दोन्ही मतदारसंघांत धंगेकर किती मताधिक्य मिळविणार आणि ते भाजपचे अन्य मतदारसंघातील मताधिक्यापेक्षा अधिक राहील का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शिवाजीनगर
शिवाजीनगर मतदारसंघात दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न करण्यात आले. गेल्या निवडणुकीपेक्षा शिवाजीनगरमधील मतदान अकराशेने कमी झाले आहे. सर्वांत कमी मतदान शिवाजीनगर मतदारसंघात झाले आहे. येथे दोन्ही उमेदवारांपैकी कोणीही मताधिक्य घेतले, तरी ते फारसे असणार नाही, असा कार्यकर्त्यांचा अंदाज आहे.
कोथरूड
कोथरूडमध्ये भाजपला किती मताधिक्य मिळणार, कसबा पेठ आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये त्यापैकी किती मताधिक्य कमी करण्यात धंगेकर यशस्वी ठरणार. अन्य तीन मतदारसंघांचा कौल कोणाच्या बाजूने झुकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः वडगाव शेरीमधील मतदार कोणाच्या पारड्यात वजन टाकणार, यावर पुण्याचा निकाल अवलंबून राहणार आहे.
हेही वाचा
पाकिस्तानला चर्चा का हवीय?
मान्सून यंदा 19 मेपूर्वीच अंदमानात, 31 मे रोजी केरळात
2028 पर्यंत बनणार दक्षिण कोरियाचे तरंगते शहर