धूळ वादळाचा मुंबईला तडाखा
मुंबई ः Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रचंड वादळी पाऊस आणि धुळीचे वादळ अकस्मात धडकल्याने सोमवारी संध्याकाळी मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसराची अक्षरशः धुळधाण उडाली. ताशी 75 किलोमीटर वेगाने वाहणार्या वार्यांनी अनेक ठिकाणी झाडे कोसळली, झाडांच्या फांद्या तुटल्या. घाटकोपरमध्ये पूर्व द्रुतगती मार्गाला लागूनच असलेल्या पेट्रोल पंपावर एक भले मोठे अवैध होर्डिंग कोसळून आठजण ठार झाले, तर 51 जण अडकून पडले. यात किमान 80 गाड्यांचेही नुकसान झाले. या धूळ-पावसाच्या वादळाचा फटका विमानसेवेलाही बसला. मुंबईची लोकलही काही काळ ठप्प झाली.
या वादळाचा कोणताही अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला नव्हता. सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास महामुंबई परिसरात या वादळाला सुरुवात होताच हवामान खाते जागे झाले. धुळीचे हे वादळ किमान तास-दीड तास चालेल आणि तीन ते चार तासांत मुंबई-ठाण्यासह परिसरात दणकून पाऊस पडेल, असा इशारा जारी करण्यात आला.
दुपारी 4.30 च्या दरम्यान प्रचंड वेगवान वारे मुंंबईवर चाल करून आले. त्यांच्यासोबत आलेले धुळीचे लोट मुंबईवर आदळले. समोरचे काहीच दिसू नये, अशी स्थिती निर्माण झाली. पश्चिम उपनगरे, दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व उपनगरांसह संपूर्ण मुंबईच या धुळीच्या वादळाने घेरली. द़ृश्यमानता कमी झाल्याने मुंबईचे विमानतळ अक्षरशः जागीच थांबले. मुंबईत उतरणारी विमाने धावपट्टी दिसत नसल्याने इतरत्र वळवण्यात आली. संध्याकाळच्या आणि रात्रीच्या विमानांची उड्डाणेही रखडली. तसा इशारा देणारे संदेश प्रवाशांना पाठवले गेले. विमान प्राधिकरणाने जारी केलेेल्या अहवालानुसार, यावेळी पूर्व- उत्तर दिशांनी वाहणार्या वार्यांचा वेग हा आधी ताशी 55 किलोमीटर होता, तो नंतर 75 किलोमीटरवर पोहोचला. डोंबिवली, बदलापुरात वादळी वार्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे. पालघरमध्ये गारांचा पाऊस कोसळत आहे. बदलापूर, कल्याण भागात तसेच वांगणी, बदलापूरमध्ये वादळी वार्यांचा वेग तर ताशी 107 कि.मी. इतका होता.
मुंबई : घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपावर भले मोठे होर्डिंग
कोसळले आणि आठ जणांचा नाहक बळी गेला. त्यातला एक दुर्दैवी तरुण म्हणजे भारत राठोड. या पंपावर फक्त पेट्रोल भरण्यासाठी थांबणे हाच त्याचा गुन्हा ठरला. वैद्यकीय साहित्य घरपोच देण्याचे काम तो करत असे. कोरोनात आई गेली, घरी लहान भाऊ, वडील अपघाताने अंथरूणाला खिळलेले त्यामुळे या घराचा हा कर्ता मुलगाच होर्डिंगचा बळी ठरला. आणखी वृत्त : पान 3
वरून… मुंबईच्या लोकलचीही दाणादाण उडवली. मुलुंड ते ठाणेदरम्यान एक झाड ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली. वादळी वार्यांच्या झपाट्यात ओव्हरहेड वायर हेलकावे खाऊ लागल्याने हार्बरची लोकलही ठिकठिकाणी थांबवावी लागली. एक होडिर्र्ंग कोसळल्याने आरे आणि अंधेरी पूर्व मेट्रो स्थानकादरम्यानची मेट्रो सेवा खंडित करण्यात आल्याचे मेट्रो रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. घाटकोपर रेल्वे कॉलनीत होर्डिंग कोसळल्याने बेस्टची 406 मार्गावरील सेवा संध्याकाळी बंद करण्यात आली.
ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
लोकल बंद पडताच टॅक्सीशिवाय पर्याय उरला नाही. त्यातच पूर्व उपनगरात, विक्रोळी, भांडुप, मुलुंडमध्ये प्रचंड पाऊस सुरू झाल्याने घाटकोपरमध्ये वाहतूक तुंबली. जागोजागी झाडे कोसळल्याने वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे मुंबई शहर व उपनगरातील सर्व रस्ते वाहतूक कोंडीत अडकले होते. शहर विभागातील डी. एन. रोड फोर्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, जे. जे. हॉस्पिटल जंक्शन, कळबादेवी रोड, त्याशिवाय पश्चिम द्रुतगती महामार्गासह पूर्व द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, एस. व्ही. रोड लिंक रोड, अन्य रस्त्यांवर ठिकठिकाणी झालेल्या वाहतूक कोंडीत हजारो वाहने अडकून पडल्यामुळे तासाभराचा प्रवास दोन ते अडीच तासांवर गेला.
प्रचंड पडझड
घाटकोपरला पूर्व द्रुतगती महामार्गावर महाकाय लोखंडी होर्डिंग अचानक रस्त्यावर कोसळून 80 गाड्यांचे नुकसान झाले, तर 51 पादचारी जखमी झाले. अग्निशमन दलाने धाव घेत जखमींना राजावाडी रुग्णालयात हलवले. जखमींपैकी आठजणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. हे होर्डिंग अवैध होते. त्यावर संबंधित एजन्सीचा फक्त नंबर होता. यामुळे अवैध होर्डिंगचा मोठा प्रश्न चर्चेत येऊ घातला आहे. वडाळ्यातही बरकत अली नाक्यावरील श्रीजी टॉवरचा कार पार्किंगसाठी बांधलेला लोखंडी सांगाडा पत्त्यासारखा कोसळला आणि पार्क केलेल्या 8 ते 10 गाड्या त्याखाली सापडल्या, तर एकजण जखमी झाला. जोगेश्वरी पूर्वला मेघवाडी येथे नारळाचे झाड कोसळले. मुंबई शहर व उपनगरात 50 पेक्षा जास्त झाडे व झाडांच्या फांद्या कोसळल्या. काही ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटनाही घडल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. नवी मुंबईतही 30 हून अधिक झाडे उन्मळून पडली. या पडझडीचे प्रमाण खासकरून वाशी, सानपाडा, कोपरखैरणे, ऐरोली, बेलापूर, नेरूळ आणि दिघा परिसरात अधिक होते.
सायंकाळी 4 ते 6 पर्यंत पडलेला पाऊस
दादर, जी-उत्तर
कार्यालय – 18 मिमी
रावली कॅम्प – 18 मिमी
पूर्व उपनगर
भांडुप, एस वॉर्ड – 78 मिमी
मिठानगर मुलुंड टी वॉर्ड – 67
कुर्ला, एल प्रभाग – 42 मिमी,
चेंबूर एम-पश्चिम – 32 मिमी,
विक्रोळी – 31 मिमी
गोवंडी – 30
पश्चिम उपनगर
गोरेगाव पी-दक्षिण 41 मिमी
अंधेरी के-पूर्व – 36 मिमी
अंधेरी, के-पश्चिम – 38
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 | मोदींच्या सभेसाठी नाशिकच्या पिंपळगावला जय्यत तयारी
Cyber Crime | पुण्यात डॉक्टरला तब्बल 36 लाखांचा सायबर गंडा..
Teachers Election :’शिक्षक’च्या निवडणुकीला लाभणार नवीन अधिकारी