इचलकरंजीत युवकावर कोयत्याने हल्ला
इचलकरंजी, Bharat Live News Media वृत्तसेवा : क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून सूरज अशोककुमार राठी (वय 32, रा. नारायण पेठ) या युवकावर कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला. त्यामध्ये सूरज गंभीर जखमी झाला. सोमवारी सकाळी 10.30 च्या सुमारास जिजामाता मार्केट येथे झालेल्या या थरारक घटनेने व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली. हल्लेखोर समर्थ राजकुमार जाधव व प्रणव मानकर स्वत:हून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हजर झाले. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.
जखमी सूरज राठी हा जिजामाता मार्केट येथील मुलतानमल बाबुलाल अॅन्ड कंपनी या कापड पेढीवर दिवाणजी म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी पेढीचे शटर उघडत असताना मागून आलेल्या दोघांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. भेदरलेला सूरज जीव वाचविण्यासाठी समोरच असलेल्या बाबुलाल चोपडा यांच्या पेढीत पळाला. हल्लेखोरही त्याचा पाठलाग करीत पेढीत घुसले. सूरजने सूत बाचक्यांच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी तिथेही त्याच्यावर वार केले. अखेरीस सूरज याच पेढीतील बाथरूममध्ये शिरल्याने तो बचावला. सूरजच्या डोक्यात, दोन्ही हातांवर व खांद्यावर वार झाले आहेत. त्यास नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.
घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक लॅब पथकालाही पाचारण करण्यात आले होते. घटनेनंतर संशयितांनी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर राहून कबुली दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. अधिक तपास स.पो.नि. पूनम माने करीत आहेत.
घटनास्थळाचे द़ृश्य भीषण
घटनास्थळाचे द़ृश्य भीषण होते. पेढीवर रक्ताचा सडा पडला होता. ठिकठिकाणी सूत बाचक्यांवरही रक्ताचे शिंतोडे उडाले होते. पेढीवरच कोयता टाकून हल्लेखोरांनी पलायन केले. घटनास्थळी घड्याळ, अंगठी, कानातील बाली पडल्याचे पोलिसांना दिसून आले. सूरज याच्यावर भरदिवसा हल्ला करण्यात आल्याने जिजामाता मार्केट परिसरात व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.