नागपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू
नागपूर; Bharat Live News Media वृतत्सेवा : ढगाळ वातावरण, कडक उन असे उकाडा वाढविणारे वातावरण असले तरी गेल्या २४ तासात पावसाने नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली. यादरम्यान गारपिटीसह झालेल्या वादळी पावसात काटोल तालुक्यातील आलागोंदी येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. भागवतराव भोंडवे (वय ५०) व जयदेव मनोटे अशी मृत झालेल्याची नावे आहेत. यापूर्वी एकाचा मृत्यू तर ८ जनावरे दगावल्याची घटना घडली आहे.
कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीत आलागोंदी येथील गोविंदराव पंचभाई यांच्या घरी रविवारी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कंदुरीचा हा कार्यक्रम त्यांच्या शेतात होणार असल्याने अन्य पाहुण्यांसह मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील रहिवासी असलेले भागवतराव भोंडवे तसेच मध्य प्रदेशातील प्रभातपट्टण येथील जयदेव मनोटे हे या कार्यक्रमासाठी शेतात पोहोचले होते. दरम्यान, शेतात कार्यक्रम सुरू असताना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने तारांबळ उडाल्याने पाहुण्यांनी ठिकठिकाणी आश्रय घेतला.
भोंडवे आणि मनोटे शेतातील एका पळसाच्या झाडाखाली गेले. मात्र, नेमकी याचवेळी या झाडावर वीज कोसळली आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार राजकुमार त्रिपाठी, पोलीस उपनिरीक्षक धवल देशमुख यांच्या नेतृत्वात महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. यानंतर आज या दोन्ही मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नागपूर शहरात गेल्या २४ तासात तापमानात चार ते पाच अंशाची घसरण होऊन तापमान ३८.२ वर स्थिरावले आहे. रविवारी अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक ४१. ८ अंश तापमान नोंद करण्यात आली. याशिवाय वाशिम येथे ४१. ६ तापमान होते. नागपूर, गोंदिया ,भंडारा वगळता इतर जिल्ह्यातील तापमान ४०° पेक्षा अधिक होते. गुरुवार १६ मे पर्यंत हिच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. १६ ते २२ मे या काळात पावसाची फारसी शक्यता नसल्याने पुन्हा एकदा मे महिना विदर्भाला उन्हाचा तडाखा देणारा ठरणार आहे.