राष्ट्रवादी-भाजपात श्रेयवाद; इंदापुरातील गावागावांत लागल्या पैजा
जावेद मुलाणी
इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघाची मतदानाची प्रक्रिया सात मे रोजी पार पडली. त्यानंतर इंदापूर तालुक्यातील गावागावांत महायुती व महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांत आपलाच उमेदवार विजयी होणार अशा पैजा लागल्या आहेत. चर्चेचे गुर्हाळ तापायला सुरुवात झाली आहे. 4 जूनपर्यंत अंदाजाच्या या चर्चा सुरूच राहणार आहेत. बारामती मतदारसंघात पवार विरुध्द पवार अथार्त नणंद विरुद्ध भावजय लढाई पक्की झाल्यानंतर इंदापूर तालुक्यात मागील तीस वर्षांहून अधिक काळापासून एकमेकांच्या विरोधातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकजुटीने काम करा असा आदेश आल्यानंतर व्यासपीठावर एकत्र दिसू लागले. भाजपाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, त्यांचे सर्व समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह त्यांचेही कार्यकर्ते प्रचाराला लागले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापुरातील नेत्यांची दिलजमाई केली.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटात जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, निरा भीमाचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांच्यासह बरेच प्रवेश झाल्याने काहीसे इंदापुरात एकतर्फी वाटणार्या निवडणुकीला रंग चढला. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता गावागावात पैजांची भाषा चालू झाली आहे. सुरुवातीला महायुतीमधील नेते मंडळींना एकत्र प्रचार करताना अवघडल्यागत वाटत होते. मात्र, अजित पवारांच्या एकत्रित सात सभांमुळे तालुक्यात चांगलेच रान उठले.
तर दुसरीकडे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील सभा घेतल्याने यामुळे आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीबरोबरच, निरा डावा, खडकवासला कालव्याचे पाणी, लाकडी निंबोडी योजना हे प्रश्न चांगलेच गाजले. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर गावागावात निवडणुकांच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. कुणी कुणाची जिरवली, कुणी छुपा पाठिंबा दिला, कोण विजयी होणार, कुठे लीड कमी पडणार , कोणी कोणाला चालवले अशा चर्चा होत आहेत. यातून पैजा लागत आहेत. विधानसभेला कोण कोणाचे काम करणार.. कोणाचा शब्द खरा होणार याचीदेखील जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. यामुळे दिवसागणिक इंदापूरचे राजकारण तापू लागले आहे.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यात सकाळी ११ पर्यंत १७.५१ टक्के मतदान
ठाणे : धीम्या गतीच्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले; चाकरमान्यांचे हाल
सिनेस्टाईल थरारनाट्य : पोहत पाठलाग करून दारू विक्रेत्याला पकडले