हिरा सरवदे
पुणे : बांधकामाच्या ठिकाणी काम करणार्या मजुरांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेली एसओपी
(मार्गदर्शक नियमावली) पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांची बदली झाल्यानंतर गुंडाळण्यात आली आहे. दरम्यान, ठेकेदारी पद्धतीने बांधकामांची कामे दिली जात असल्याने अपघात होऊन एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर मुख्य बिल्डर मोकाट सुटतात. त्यामुळे अपघातप्रकरणी मुख्य बिल्डरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी बांधकाम मजुरांच्या संघटनांकडून होत आहे.
शहरीकरणाच्या प्रक्रियेत मजूर महत्त्वाची भूमिका निभावतो. पुणे शहर आशिया खंडामध्ये सर्वाधिक फ्लॅट असणारे शहर आहे. त्यामुळे बांधकामांवर काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक शहरात स्थलांतर करतात. बांधकाम व्यावसायिक स्थलांतरित कामगारांच्या राहण्याची व्यवस्था बांधकाम साईटवरच करतात. ही ठिकाणे अपघातप्रवण परिस्थितीमधील असतात. मजुरांना राहण्यासाठी उभारलेल्या घरांचा दर्जा निकृष्ट असतो. त्यामुळे स्थलांतरितांसाठी निर्माण केलेल्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही.
कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेसाठी नेट जाळी, सेफ्टी बेल, हेल्मेट आदी साधने संबंधित बिल्डरने उपलब्ध करून देणे कामगार कायद्यानुसार बंधनकारक आहे.
मात्र, या कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे बांधकाम साईटवर वरून पडून किंवा राहण्याच्या ठिकाणी भिंत कोसळून मजुरांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. बांधकाम व्यावसायिक बांधकाम मजुरांच्या सुरक्षेपासून पळ काढण्यासाठी, विविध कामे करण्यासाठी कंत्राटी ठेकेदारांची नेमणूक करतात. एखादा अपघात होऊन मजुराचा मृत्यू झाल्यास मुख्य बिल्डर मोकाट राहतो. खरेतर कंत्राटी कामगार कायद्यानुसार अपघात झाल्यानंतर त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्य बिल्डरवर असते.
कोंढवा येथे 28 जून 2019 रोजी बांधकाम साईटवरील भिंत कोसळून 15 बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला. त्यानंतर चारच दिवसाने म्हणजे 2 जुलै 2019 रोजी आंबेगाव येथे भिंत कोसळून सहा बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर बांधकाम मजूर सभेच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलिस उपायुक्त सुहास बावचे, बांधकाम मजूर सभेचे नितीन पवार यांनी बांधकामाच्या ठिकाणी करावयाच्या सुरक्षेसंदर्भात एक एसओपी तयार केली होती.
यामध्ये पोलिस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन यांची स्थलांतरित कामगारांसंदर्भात असलेली जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. मात्र, डॉ. के. व्यंकटेशन आणि बावचे यांची बदली झाल्यानंतर सुरक्षेसंदर्भातील एसओपी गुंडाळण्यात आल्याचे नितीन पवार यांनी दैनिक ’पुढारी’ला सांगितले. ही एसओपी अंमलात आणल्यानंतर प्रशासनाची जबाबदारी निश्चित होईलच शिवाय अपघात झाल्यानंतर मुख्य बिल्डरही मोकाट सुटणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
अनेक बांधकाम साईटवर सुरक्षेचे तीनतेरा
नऊ वर्षांच्या मुलाच्या डोक्यात बांधकाम साईटवरून लोखंडी गट्टू पडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे बांधकाम साईटवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर दैनिक ‘पुढारी’ने पाहणी केल्यानंतर अनेक बांधकाम साईटवर सुरक्षेच्या उपाय योजनाच नाहीत. मोठ्या साईटवर सुरक्षेच्या उपाययोजना दिसतात. मात्र, लहान बिल्डरच्या बांधकाम साईटवर आणि उपनगरांमधील अनधिकृत बांधकामांच्या साईटवर सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळते. उपनगरांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी हेल्मेट, सुरक्षा बेल्ट, नेट जाळी याचा कसलाही पत्ता नसतो. सेफ्टी बेल्टशिवाय मजूर काम करतात. याबाबत बिल्डरच्या कर्मचार्यांना विचारणा केल्यानंतर सुरक्षेची साधने आहेत, मात्र, मजुरांची नजर मेल्याने ते सेफ्टी बेल्ट व हेल्मेट वापरत नसल्याचे अजब उत्तर मिळते.
शहरीकरणामुळे बिल्डर लॉबी मजबूत झाली आहे. बांधकाम साईटवर अपघात झाल्यानंतर बिल्डर स्थानिक प्रशासनाला मॅनेज करून एका रात्रीत मयत व्यक्तीचे प्रेत व सर्व स्थलांतरितांना रात्रीमध्ये मूळ गावी पोहोच केले जाते. परिणामी, कामगार नुकसानभरपाई कायद्यांतर्गत द्याव्या लागणार्या भरपाईपासून ते वाचतात. शिवाय कामाच्या ठिकाणी सुरक्षेची साधने नसल्यास कामगार विभाग काम बंद ठेवण्याचे आदेश देऊ शकतात. मात्र, आजवर बांधकाम विभागाने कोणालाही काम बंद ठेवण्याचे आदेश दिलेले ऐकिवात नाही. त्यामुळे बांधकाम साईटवर अपघात झाल्यानंतर मुख्य मालक व मुख्य बिल्डरवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आम्ही वारंवार आंदोलने केली आहे. आमच्या आंदोलनाला यश येत असतानाच बिल्डरांची लॉबी सत्ताधार्यांना भेटली आणि बिल्डरांना अभय मिळाले आहे.
– नितीन पवार, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश बांधकाम मजूर सभा
हेही वाचा
Nashik News : उकळती भाजी अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू
म्यानमार पुन्हा धुमसतोय!
लवंगी मिरची : काय सापडले का?
The post पुणे : बांधकाम मजुरांच्या सुरक्षेची ‘एसओपी’ गुंडाळली appeared first on पुढारी.
पुणे : बांधकामाच्या ठिकाणी काम करणार्या मजुरांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेली एसओपी (मार्गदर्शक नियमावली) पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांची बदली झाल्यानंतर गुंडाळण्यात आली आहे. दरम्यान, ठेकेदारी पद्धतीने बांधकामांची कामे दिली जात असल्याने अपघात होऊन एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर मुख्य बिल्डर मोकाट सुटतात. त्यामुळे अपघातप्रकरणी मुख्य बिल्डरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी बांधकाम …
The post पुणे : बांधकाम मजुरांच्या सुरक्षेची ‘एसओपी’ गुंडाळली appeared first on पुढारी.