या ईव्हीएममध्ये दडलंय काय?

मराठवाड्यातील मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. ज्यात नांदेड, परभणी व हिंगोली मतदार संघांत, तर 7 मे रोजी लातूर आणि धाराशिवमध्ये मतदान झाले. पहिल्या टप्प्यातील अधिकृत आकडेवारीनुसार 2019च्या सरासरीपेक्षा कमीच मतदान झाले. घटलेल्या मतदानाचा फटका कुणाला बसतो, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीडमध्ये अखेरच्या टप्प्यात, 13 मे रोजी मतदान होत आहे. नांदेड, …

या ईव्हीएममध्ये दडलंय काय?

धनंजय लांबे

मराठवाड्यातील मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. ज्यात नांदेड, परभणी व हिंगोली मतदार संघांत, तर 7 मे रोजी लातूर आणि धाराशिवमध्ये मतदान झाले. पहिल्या टप्प्यातील अधिकृत आकडेवारीनुसार 2019च्या सरासरीपेक्षा कमीच मतदान झाले. घटलेल्या मतदानाचा फटका कुणाला बसतो, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीडमध्ये अखेरच्या टप्प्यात, 13 मे रोजी मतदान होत आहे. नांदेड, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या लक्षवेधी लढतींमध्ये कोण बाजी मारेल, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
नांदेडमध्ये विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्यापुढे काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी आव्हान उभे केले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपची वाट धरली. त्यामुळे वरकरणी पाहता चिखलीकर यांचे पारडे जड वाटत असले, तरी अशोक चव्हाण यांच्यावर नाराज असलेल्या किती मतदारांचे, कार्यकर्त्यांचे मन वळविण्यात भाजपला यश आले, यावर या मतदार संघातील यशापयशाची गणिते अवलंबून आहेत. गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने चांगलीच मुसंडी मारल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला होता. अशोक चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेस जिल्ह्यात वरचढ होती. आता चव्हाणही भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपचे पारडे जड दिसते; पण काँग्रेसचे आव्हान संपुष्टात आलेले नाही. नेत्यांनी पक्षांतरे केली तरी कार्यकर्ते आणि जनता ‘काँग्रेस माइंडेड’च आहे, हे यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही दिसून आले आहे.
परभणी लोकसभा मतदार संघात महायुतीचे महादेव जानकर आणि शिवसेना उबाठा गटाचे संजय जाधव यांच्यात लढत झाली. वंचित बहुजन आघाडीचे पंजाबराव डख आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजन क्षीरसागर यांच्या उमेदवारीमुळेही या मतदार संघात रंगत आली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले गेलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे जानकर यांना महायुतीने एका जागेची ऑफर दिली आणि ते परभणीचे उमेदवार बनले. या मतदार संघात महायुतीदेखील ओबीसी नेत्याच्या शोधात होती. तो त्यांना जानकर यांच्या रूपाने मिळाला. सत्ताविरोधी जनमत (अँटीइन्कम्बन्सी), पक्षात पडलेली फूट, नवे चिन्ह हे संजय जाधव यांच्यासाठी आव्हानात्मक मुद्दे होते, तर बाहेरचे उमेदवार, एवढाच अडथळा जानकरांपुढे होता. तरीही रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी त्यांची बाजू नेटाने लढविली. भाजपच्या आमदार मेघना बोर्डिकर यांनीही परिश्रम घेतले. संजय जाधव यांच्यासाठी शिवसेनेचे आमदार राहुल पाटील, काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी आपली ताकद पणाला लावली. दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे केले जात आहेत.
हिंगोलीत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना तिकीट नाकारून शिवसेनेने (शिंदे) बाबुराव कदम-कोहाळीकर यांना संधी दिली. हेमंत पाटील यांना उमेदवारी द्या म्हणत त्यांचे समर्थक मुंबईत जाऊन बसले, तर त्यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी भाजपचे कार्यकर्ते सक्रिय झाले. इतके की भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख रामदास पाटील यांच्यासह तीन पदाधिकार्‍यांनी उमेदवारी अर्ज भरून टाकले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला माघार घेत उमेदवार बदलावा लागला. त्यांनी बाबुराव कदम यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे उबाठा गटाने नागेश पाटील-आष्टीकर यांना मैदानात उतरविले. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. हे दोन्ही उमेदवार नांदेड जिल्ह्यातील आहेत. मात्र, राज्य पातळीवर फुटलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील निष्ठावंतांचे प्रमाण हिंगोलीत मोठे आहे. ओबीसी मतदानाचा फायदा महायुतीला मिळेल, असे अंदाज वर्तविले जात आहेत. मशाल हे चिन्ह शिवसेनेच्या मतदारांसाठी नवीन असल्याचा फायदाही कोहाळीकर यांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लातूर या राखीव मतदार संघातून कोणत्याही परिस्थितीत यावेळी भाजपला यश मिळू देणार नाही, असा चंग बांधूनच दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे समर्थक मैदानात उतरले होते. रेल्वे कोच फॅक्टरी हा रोजगाराच्या दृष्टीने भ्रमाचा भोपळा ठरला आणि विकास प्रकल्पांच्या आघाड्यांवरही विद्यमान खासदार प्रभावी ठरले नाहीत. शिवाय, गेल्यावेळी ज्या उमेदीने भाजपच्या यंत्रणेने प्रचार हाती घेऊन सुधाकर श्रुंगारे यांना लोकसभेत पाठविले, तो उत्साह यावेळी पाहावयास मिळाला नाही. तसेच, या मतदार संघातील सहापैकी पाच जागांवर भाजपविरोधी आमदार मागील विधानसभा निवडणुकीत निवडून आले. त्यामुळे काँग्रेसचे डॉ. शिवाजीराव काळगे यांना लाभ झाला असावा, असे राजकीय विश्लेषक मानतात.
धाराशिव मतदार संघात उबाठा गटाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) नुकत्याच प्रवेश केलेल्या अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्यात लढत रंगली. गेल्या निवडणुकीत राजेनिंबाळकर यांनी भाजपच्या राणाजगजितसिंह यांचा सुमारे सव्वा लाख मतांनी पराभव केला होता. यावेळी पक्षफुटीचा, बदललेल्या चिन्हाचा (धनुष्यबाणाऐवजी तुतारी) राजेनिंबाळकर यांना फटका बसतो की, शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या पाठिंब्यासह राणाजगजितसिंह यांचा प्रभाव आणि मतदार संघातील सहापैकी चार आमदारांंची शक्ती अर्चना पाटील यांच्या पथ्यावर पडते, याचा निर्णय ईव्हीएममध्ये बंद झाला आहे.
बीड मतदार संघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे प्रमुख उमेदवार आहेत. शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी ऐनवेळी रिंगणातून माघार घेतल्यामुळे या लढतीत अधिकच चुरस निर्माण झाली आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव अजूनही कायम असलेल्या या मतदार संघात महायुतीच्या पंकजा मुंडे यांची सरशी व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) मंत्री धनंजय मुंडे यांनीही कंबर कसली आहे. गेल्यावेळी डॉ. प्रीतम मुंडे यांना बजरंग सोनवणे यांचा सव्वा लाख मतांनी पराभव केला होता. या मतदार संघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ सध्या महायुतीकडे आहेत. ही मुंडेंची जमेची बाजू. बजरंग सोनवणे यांच्यासमोर तुतारी हे नवे चिन्ह मतदार संघात पोहोचविण्याचे आव्हान आहेच, या मतदार संघात नेहमीच ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत व्हावी, अशी रणनीती वरिष्ठ नेत्यांनी आखलेली आहे. त्यात ओबीसी उमेदवारांनी बाजी मारल्याचा इतिहास आहे.
जालना मतदार संघात भाजपचे रावसाहेब दानवे आणि महाआघाडीतून काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे हे प्रमुख उमेदवार आहेत. दानवे हे 1999 पासून सलग लोकसभेवर जाणारे खासदार आहेत, तर डॉ. काळे हे फुलंब्री विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार. फुलंब्री, सिल्लोड आणि पैठण हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदार संघाचे भाग आहेत. जालना शहराचे आमदार कैलास गोरंट्याल वगळता पाचही आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे दानवे यांंचे पारडे जड आहे. शिवसेना उबाठा गट या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरलेला दिसत नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे ज्या घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात, तो परभणी लोकसभा मतदार संघात आहे. बाहेरचा उमेदवार हा शिक्काही काळे यांच्यावर आहे. अर्थात, काँग्रेसचा पारंपरिक मतदार त्यांच्या पाठीशी आहे. सलग सहा निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे काँग्रेसच्या संघटनेमध्ये औदासीन्य आहे. उमेदवार महाआघाडीचा असला, तरी उर्वरित दोन पक्षांच्या पाठिंब्याशिवाय डॉ. काळे यांना ही निवडणूक सोपी नाही.
छत्रपती संभाजीनगरात शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध एमआयएम अशा या लढतीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार, चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांनी ताकद पणाला लावल्यामुळे यावेळीही मागील निवडणुकीची पुनरावृत्ती होते, की शिवसेनेचा शिलेदार लोकसभेत जातो, याबद्दल राज्यभरात कमालीची उत्सुकता आहे. भाजपचे राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे निवडणूक लढविण्यास उत्सुक होते. मात्र, ही जागा शिवसेनेची असल्यामुळे आपल्यालाच मिळावी, असा आग्रह शिंदे गटाने धरला होता. अखेर पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी देऊन हा वाद मिटविण्यात आला.
चंद्रकांत खैरे यांनी सलग चार निवडणुका जिंकून 1999 ते 2014 अशी 15 वर्षे या मतदार संघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. मात्र, याच काळात शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला आणि 2019च्या निवडणुकीत मतदारांनी त्याचा जाब विचारत खैरे यांना नाकारले. भुमरे यांचा पैठण मतदारसंघ जालना लोकसभा मतदार संघाचा भाग असला, तरी संभाजीनगरच्या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ सध्या महायुतीकडे आहेत. ज्या कन्नड मतदार संघात शिवसेना उबाठा गटाचे एकमेव आमदार उदयसिंग राजपूत आहेत, तेथे अपक्ष उमेदवार डॉ. जीवन राजपूत यांनी आव्हान उभे केले आहेत. गेल्यावेळी ‘एमआयएम’ला वंचित बहुजन आघाडीची साथ होती. यावेळी मात्र तसे चित्र नाही. वंचितने आपला स्वतंत्र उमेदवार, अफसर खान यांच्या रूपाने रिंगणात उतरविला आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात शहराचे संभाजीनगर नामकरण कोणी केले, कोणी विरोध केला, यावरूनही श्रेयवाद उफाळला आहे. या मुद्द्याचाही मतदार विचार करतील, असे मानले जाते.
मराठवाड्यात यंदा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामुळे चांगलेच पेटले. त्याचा प्रभाव सर्व आठही जिल्ह्यांमध्ये कमी-जास्त फरकाने जाणवला. शिवाय, महायुती आणि महाआघाडीतील तीनही पक्षांनी एकत्र येऊन उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न केले, असे चित्र अभावानेच एखाद्या मतदार संघात दिसले. जे उमेदवार तीनही पक्षांच्या पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना एकत्र आणू शकले, त्यांच्या विजयाची शक्यता वाढली आहे. धाराशिव मतदार संघात मतदानाच्या दिवशी झालेला खून चर्चेत आला, तसेच संभाजीनगरातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान अर्ज दाखल केल्यानंतर खुलताबादेतील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आशीर्वाद घेऊन आले, याचीही मराठवाड्यात चांगलीच चर्चा झाली.