चौथ्या टप्प्यात हायप्रोफाईल लढती

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रासह 10 राज्यांमधील 96 लोकसभा मतदार संघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार असून, त्यामध्ये पाच केंद्रीय मंत्र्यांसह एक माजी मुख्यमंत्री, दोन क्रिकेटर्स आणि एका प्रसिद्ध अभिनेत्याचा समावेश आहे. या दिग्गजांसह एकूण 1717 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. महाराष्ट्रात पुणे, मावळ, शिरूर, नगर, शिर्डी, …

चौथ्या टप्प्यात हायप्रोफाईल लढती

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रासह 10 राज्यांमधील 96 लोकसभा मतदार संघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार असून, त्यामध्ये पाच केंद्रीय मंत्र्यांसह एक माजी मुख्यमंत्री, दोन क्रिकेटर्स आणि एका प्रसिद्ध अभिनेत्याचा समावेश आहे. या दिग्गजांसह एकूण 1717 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. महाराष्ट्रात पुणे, मावळ, शिरूर, नगर, शिर्डी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, जळगाव, रावेर या 11 लोकसभा मतदार संघात मतदान पार पडणार आहे. आंध्र प्रदेशच्या सर्व 25 जागांवर एकाच दिवशी मतदान होणार आहे.
कनौजमध्ये अखिलेश यादव 12 वर्षांनंतर रिंगणात
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव कनौज या आपल्या पारंपरिक मतदार संघातून तब्बल 12 वर्षांनंतर निवडणूक लढवत आहेत. भाजपचे विद्यमान खासदार सुब्रत पाठक यांच्याशी त्यांची टक्कर आहे. बसपाने इम्रान बिन जफर यांना रिंगणात उतरवले आहे.
बहरामपूरमध्ये युसूफ पठाण मैदानात
पश्चिम बंगालमधून यंदा दोन क्रिकेटर्स मैदानात उतरले आहेत. बहरामपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेले क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा सामना काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांच्याशी होत आहे. निर्मलकुमार साहा हे भाजपचे, तर संतोष विश्वास हे बसपाचे उमेदवार आहेत.
वर्धमानमध्ये कीर्ती आझाद मैदानात
पश्चिम बंगालच्या वर्धमान लोकसभा मतदार संघात क्रिकेटपटू कीर्ती आझाद मैदानात उतरले आहेत. भाजपने त्यांच्याविरोधात दिलीप घोष यांना उमेदवारी दिली आहे. प्रभूनाथ साहा हे बसपाचे, तर सुकृती घोषाल माकपच्या उमेदवार आहेत.
पाच केंद्रीय मंत्र्यांच्या भाग्याचा फैसला होणार
बिहारच्या उजियारपूर लोकसभा मतदार संघातून केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय तिसर्‍यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय जनता दलाचे आलोककुमार मेहता रिंगणात उतरले आहेत. बसपाने मोहनकुमार मौर्य यांना उमेदवारी दिली आहे.
बिहारच्या बेगूसराय मतदार संघातून केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीराज सिंह यांची लढत बसपाचे चंदनकुमार दास आणि इंडिया आघाडीतील माकपचे उमेदवार अवधेशकुमार राय यांच्याशी होत आहे.
उत्तर प्रदेशच्या खिरी लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री अजय मिश्रा-टेनी तिसर्‍यांदा रिंगणात उतरले आहेत. समाजवादी पक्षाचे उत्कर्ष वर्मा मधूर आणि बसपाचे अंशय कालरा यांच्याशी त्यांची लढत आहे.
झारखंडच्या खुंटी लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने कालीचरण मुंडा यांना तर बसपाने सावित्रीदेवी यांना उमेदवारी दिली आहे.
तेलंगणाच्या सिकंदराबाद लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी दुसर्‍यांदा रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे दानम नागेंद्र, बसपाचे बसवानंद दांडेपू आणि बीआरएसचे पद्मराव टी. यांच्याशी त्यांची टक्कर आहे.
उन्नावमध्ये साक्षी महाराज
उत्तर प्रदेशच्या उन्नाव लोकसभा मतदार संघात माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार साक्षी महाराज यंदा नशीब आजमावत आहेत. त्यांच्या विरोधात सपाने माजी खासदार अन्नू टंडन, तर बसपाने अशोककुमार पांडेय यांना उमेदवारी दिली आहे.
महुआ मोईत्रा पुन्हा रिंगणात
पश्चिम बंगालच्या कृष्णानगर लोकसभा मतदार संघात तृणमूल काँग्रेसकडून महुआ मोईत्रा पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. भाजपने त्यांच्याविरोधात राजा कृष्णचंद्र राय यांच्या परिवारातील सदस्य अमृता राय यांना उमेदवारी दिली आहे. एस. एम. सादी माकपचे उमेदवार आहेत.
शत्रुघ्न सिन्हा दुसर्‍यांदा रिंगणात
पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर दुसर्‍यांदा मैदानात उतरले आहेत. भाजपने त्यांच्याविरोधात एस. एस. अहलुवालिया यांना उमेदवारी दिली आहे. जहाँआरा खान माकपच्या, तर सनीकुमार साहा बसपाचे उमेदवार आहेत.
झारखंडच्या सिंहभूज मतदार संघात माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा भाजपच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत. त्यांच्याविरोधात झारखंड मुक्ती मोर्चाने जोबा माझी यांना, तर बसपाने परदेशीलाल मुंडा यांना रिंगणात उतरवले आहे.
ओवैसी – माधवी लता यांच्यात लढत
आंध्र प्रदेशच्या हैदराबाद लोकसभा मतदार संघात एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात भाजपने फायरब्रँड नेत्या माधवी लता यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसने मोहम्मद वली उल्लाह समीर यांना, तर बसपाने के. एस. कृष्णा यांना उमेदवारी दिली आहे. श्रीनिवास यादव गड्डाम हे भारत राष्ट्र समितीचे उमेदवार आहेत. करीमनगर लोकसभा मतदार संघात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष बंदी संजयकुमार निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे वेलच्ला राजेंद्र राव, बसपाचे मारेपल्ली मोगिलैया आणि बीआरएसचे विनोदकुमार बोईयानापल्ली मैदानात उतरले आहेत.