बीड : जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी पंकजा मुंडे यांना विजयी करा : उदयनराजे भोसले
केज; Bharat Live News Media वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकनेते गोपगोपीनाथ मुंडे यांनी समाजालाच आपले कुटुंब मानले होते. पंकजा मुंडे यांनी ग्राम विकास मंत्री असताना बीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणली. विकासाच्या मुद्यावर निवडणुक न लढविता विरोधक त्याला जातीयतेचा रंग देत आहेत. अशा भुलथापांना बळी न पडता पंकजाताई मुंडे यांनाच विजयी करुन जिल्ह्याच्या विकासाला चालना द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी महायुती व घटक पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.11) दुपारी युसुफवडगाव येथील जाहीर सभेत बोलताना केले.
सभेत काय म्हणाले उदयनराजे?
खा. उदयनराजे भोसले, पालकमंत्री धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, मंत्री संभाजी निलंगेकर, आ. नमीता मुंदडा यांचे सवाद्य मिरवणुकीतून युसुफवडगाव येथील सभास्थळी आगमन झाले. यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कायम आपला सन्मान केला. त्यांनी दिलेला शब्द कायम पाळला पंकजा त्यांचीच लेक आहे. ती तुमच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करेल याची ग्वाही मी देतो. तिला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन यावेळी केले.
विरोधकांकडून जाती-पातीचे राजकारण : धनंजय मुंडे
यावेळी बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, बीड मतदार संघात प्रचार करताना विरोधक विकासाच्या मुद्याला बगल देऊन जाती-पातीचे राजकारण करत आहेत. मोदी सरकारने मोफत राशन दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार आले. राज्य सरकारच्या निर्णयामुळे 71 हजार कुणबी प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात दिले. असे सांगून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर टीका केली. शरद पवारांनी आरक्षणावर आपली भुमिका स्पष्ट करावी. असे सांगून बीड जिल्ह्याच्या नावावर लागलेला उसतोडीचा कलंक पुसण्यासाठी पंकजा मुंडे यांनाच विजयी करा. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंत्री संभाजी निलंगेकर, भाजपाचे जेष्ठ नेते रमेश आडसकर, अक्षय मुंदडा, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, यांनीही पंकजा मुंडे यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी सुत्र संचलन माधव चाटे यांनी केले, तर आभार भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान केदार यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,यांचेसह भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी हजर होते.
Latest Marathi News बीड : जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी पंकजा मुंडे यांना विजयी करा : उदयनराजे भोसले Brought to You By : Bharat Live News Media.