यवतमाळ : चिंचाळा येथे कृषी विभागाच्या पथकाची धाड; सव्वा लाखांचे बोगस बियाणे जप्त

यवतमाळ : चिंचाळा येथे कृषी विभागाच्या पथकाची धाड; सव्वा लाखांचे बोगस बियाणे जप्त

यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : खोटी जाहिरात करून राज्यात विक्रीस बंदी असलेले कापूस बियाणे आणून विक्री केले जात असल्याची माहिती मारेगाव येथील कृषी विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने शुक्रवारी (दि.११) मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे छापा टाकत सव्वा लाखाचे बियाणे जप्त केले. कृषी विभागाचे पथक धडकताच बियाण्यांची विक्री करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी कृषी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मारेगाव तालुक्यात काही व्यक्ती तेलंगणा, गुजरात राज्यातून बोगस बियाणे आणून तालुक्यात विकत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. या प्रतिबंधित बियाणांची खोटी जाहिरात करून शेतकऱ्यांच्या माथी हे बियाणे मारले जात होते. मात्र आरोपी हाती लागत नसल्याने शेतकऱ्यांची फसगत होत होती. गुरुवारी मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे आरोपी विलास वसंता चिकटे हा काही लोकांना सोबत घेऊन प्रतिबंधित कापूस बियाणे विकत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचायत समितीचे प्रभारी कृषी अधिकारी संदीप वाघमारे यांनी तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी सुनील निकाळजे आणि इतर लोकांना सोबत घेऊन चिंचाळा येथे धाड टाकली. कारवाई दरम्यान  आरोपी विलास चिकटे याच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यातून सव्वा लाख किमतीचे प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त करण्यात आले.
हेही वाचा :

नागपूर : भूकंपाची कारणे शोधण्यात येणार; भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाची माहिती
अवकाळी पावसाचा गव्हासह आंबा आणि धान्याला मोठा फटका; कृषी विभागाचा अहवाल
जळगाव जिल्ह्यात तीन दिवस ‘ड्राय डे’, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय