बलात्काराचा खोटा आरोप भाेवला: तरुणीला साडेचार वर्ष कारावासाची शिक्षा, 5.9 लाखांचा दंड!
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बलात्काराच्या खोट्या आरोपामुळे तरुणाला निर्दोष असतानाही चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात राहावे लागले. आता या प्रकरणी खोटी फिर्याद देणार्या महिलेविरोधात बरेली न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. महिलेला साडेचार वर्षे कारावासाची शिक्षा सुनावत पाच लाख ९० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केल्याचे वृत्त ‘बार अँड बेंच’ने दिले आहे.
काय घडलं होतं?
2 सप्टेंबर 2019 रोजी एका तरुणाविरुद्ध बरेली जिल्ह्यातील बारादरी पोलिस ठाण्यात अपहरण आणि तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली. दिल्लीला नेऊन नशेचा पदार्थ देवून खोलीत कोंडून बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला होता. या तक्रारीनुसार तरुणाला अटक झाली. मात्र जेव्हा या प्रकरणी खटला न्यायालयात सुरु झाला तेव्हा उलटतपासणीत तरुणीने आपण हेतुपुरस्सर खोटे बोललो. आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे सांगितले. न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 195 अंतर्गत महिलेवर खटला चालवणे योग्य मानले.
तरुणाने भोगलेल्या शिक्षे एवढा काळ तुरुंगात राहावे लागणार
न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणात तरुणाने जेवढा काळ कारागृहात घालवला आहे तेवढवाच काळ संबंधित तरुणीला कारागृहात काढावा लागेल. निर्दाष असणारा तरुण तुरुंगाबाहेर असता तर त्याने मजूर म्हणून 5,88,000 रुपयांहून अधिक कमावले असते. त्यामुळे ही रक्कम महिलेकडून वसूल करून तरुणाला देण्यात यावी. तसे न झाल्यास महिलेला 6 महिन्यांची अतिरिक्त शिक्षाही भोगावी लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
अशा महिलांमुळे खऱ्या पीडितांना नुकसान सहन करावे लागते
या संपूर्ण प्रकरणात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश ज्ञानेंद्र त्रिपाठी यांच्या न्यायालयाने त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. या घटनेत न्यायालयाने कडक भूमिका घेत अशा महिलांच्या कृत्यामुळे खऱ्या पीडितांनाच नुकसान सहन करावे लागत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी न्यायालयाने म्हटले की, समाजासाठी ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पोलीस आणि न्यायालय या माध्यमांचा वापर करणे आक्षेपार्ह आहे. महिलांना अनुचित फायद्यासाठी पुरुषांच्या हितावर हल्ला करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. पुरुषांकडून पैसे उकळण्यासाठी खोट्या केसेस दाखल करणाऱ्या महिलांसाठी न्यायालयाने सुनावलेली ही शिक्षा धाक निर्माण करेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
UP court convicts woman for falsely accusing man of rape; imposes ₹5.9 lakh fine
report by @tiwari_ji_ https://t.co/64q5NtQVVO
— Bar and Bench (@barandbench) May 7, 2024