नव्या रेडिओ लहरींचा शोध; पुण्यातील एनसीआरएच्या शास्त्रज्ञांना मोठे यश

नव्या रेडिओ लहरींचा शोध; पुण्यातील एनसीआरएच्या शास्त्रज्ञांना मोठे यश

पुणे : पृथ्वीपासून सुमारे 20 लाख प्रकाशवर्षे दूर असलेल्या एबेल या आकाशगंगा समूहातून निघालेल्या रेडिओ लहरींचा शोध पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) या संस्थेतील शास्त्रज्ञांनी जीएमआरटीच्या (जायंट मायक्रोवेव्ह टेलिस्कोप) साहाय्याने लावला आहे. या संशोधनामुळे आकाशगंगांची निर्मिती आणि उत्क्रांती याबाबतचा घटनाक्रम कळण्यास मदत होणार आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदूरच्या स्वर्णा चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या चमुने पुण्यातील खोडद येथील महाकाय रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने पृथ्वीपासून सुमारे 20 लाख प्रकाशवर्षे दूर असणार्‍या रेडिआ लहरी टिपण्यात यश मिळवले आहे. त्यांनी या रेडिओलहरी एबेल-2108 या आकाशगंगा समूहातून (गॅलेक्सी क्लस्टर) शोधल्या आहेत.
गुरुत्वाकर्षणाने आकाशगंगा एकसंध
आकाशगंगाचा समूह म्हणजे विश्वातील सर्वांत मोठी गुरुत्त्वाकर्षणाने बांधलेली रचना मानली जाते. आकाशगंगा समूहाचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या हजार ट्रिलियन पट जास्त असते. या समूहांमधील विद्युत भारित कणांच्या दोन समूहांची टक्कर झाल्याने ते ऊर्जावान होतात. ऊर्जावान कण चुंबकीय क्षेत्रामध्ये रेडिओ वर्णपटात प्रकाश उत्सर्जित करतात. या उत्सर्जनांमधील रेडिओ लहरी बहुतेक वेळा आकाशगंगा समूहाच्या बाहेर आढळतात.
एबेलच्या उत्तरेला दिसल्या लहरी
एबेल 2108 हा कमी वस्तुमान असलेला आकाशगंगा समूह आहे. त्याच्या दक्षिणेकडील भागात रेडिओ लहरी आधी आढळल्या होत्या. आता चटर्जी आणि त्यांच्या टीमने केलेल्या नवीन निरीक्षणाने आकाशगंगा समूहाच्या उत्तरेला आणखी एक अस्पष्ट रेडिओ रचना शोधली. ही रेडिओ रचना शोधल्यामुळे हा समूह दुर्मीळ दुहेरी रेडिओ लहरीचा म्हणून ओळखला गेला. आतापर्यंत सापडलेल्या सर्वांत कमी तरंगलांबी असणार्‍या या रेडिओ लहरी आहेत.
संशोधकांची टीम
या संशोधनाचे नेतृत्त्व स्वर्णा चॅटर्जी यांनी अभिरूप दत्ता (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदूर) यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. तसेच यात माजिदुल रहमान (नॅशनल त्सिंग हुआ युनिव्हर्सिटी-तैवान), रुता काळे, (नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स पुणे), सुरजित पॉल (मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन), निस्सीम काणेकर, पुणे, सी. एच. ईश्वरचंद्र, अनिल राऊत, जे. के. सोलंकी हे या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक आहेत. या संशोधन संदर्भातील लेख नुकताच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या मासिकात प्रकाशित झाला.
माणूस ज्या लहरी पाहू शकतो त्यांना ऑप्टिकल लहरी म्हणतात. तर रेडिओ आणि क्ष-किरण (एक्स-रे) या लहरी डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्याला महाकाय दुर्बिणीद्वारेच पहावे लागते. या संशोधनात अतिशय दुर्मीळ अन् तब्बल 20 लाख वर्षे वयाच्या रेडिओ लहरी आपण शोधून काढल्या आहेत. यामुळे आकाशगंगाच्या समूहात नेमके काय दडले आहे, हे समजण्यास मदत होणार आहे.
– डॉ. जे. के. सोलंकी, शास्त्रज्ञ, एनसीआरए पुणे.

हेही वाचा

राधानगरी: फेजीवडे, सरवडे मतदान केंद्रावर नावीन्यपूर्ण थीम
कोल्हापूर : सोनारवाडीतील ५० हुन अधिक नागरिक मतदानापासून वंचित
Blessing ! अवघ्या 750 ग्रॅम वजनाच्या बाळावर यशस्वी उपचार..!