विवाहाचाही बाजार! बनावट लग्नसोहळा, आंतरराज्य महिलांची टोळी जेरबंद
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
उपवराचा शोध घेऊन लग्नासाठी मुली दाखवून त्यांना दोन ते पाच लाख रुपये घेऊन लग्न लावून देण्याचा जणू विवाह सोहळ्याचा बाजार मांडला जात होता. विवाहानंतर घरातील वऱ्हाडी मंडळी झाेपलेले असतांना नववधू रोख रक्कम व दागिने घेऊन पसार होत होती. अशा आंतरराज्य महिलांच्या टोळीला पोलीसांनी जेरबंद केले आहे.
एरंडोल तालुक्यांतील कासोदा पोलीस स्टेशन परीसर तसेच जिल्हयात उपवर लग्नाच्या वयात असणाऱ्या गरजु व्यक्तींना हेरुन त्यांच्याशी मध्यस्तांमार्फत संपर्क करुन लग्नासाठी मुली दाखविले जात होत्या. त्यानंतर 2 ते 5 लाख रुपये पर्यंत पैसे घेवुन त्यांच्याशी लग्न लावून दिले जात होते. मात्र नववधू विवाह झाल्यानंतर काही दिवस खोटा खोटा संसार करतात व विश्वास संपादन करुन घरातुन रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन पसार होतात. अशी आंतरराज्य महिलांची टोळी (रॅकेट) जिल्ह्यात सक्रीय असल्याचे बातमीदारांमार्फत गोपनीय माहीती पाेलीसांना मिळाली.
प्राप्त माहितीनुसार महिला आरोपी मोना दादाराव शेंडे (वय-25 वर्षे), सरस्वती सोनु मगराज (वय-28 वर्षे दोन्ही रा.रायपुर (राज्य-छत्तीसगड), अन्वीनी अरुण थोरात (वय-26 वर्षे रा. पांडुरना (मध्यप्रदेश) या तिघींनी कासोदा गावांतील तिन अविवाहीत तरूणांसोबत सरलाबाई अनिल पाटील (वय 60 वर्षे), उषाबाई गोपाल विसपुते (वय-50 वर्षे दोन्ही नांदेड ता. धरणगाव) जिल्हा जळगांव यांना ताब्यात घेतले आहे.
या आंतरराज्य महिलांच्या टोळीने दि. 16 एप्रिल 2024 रोजी लग्न लावून दिले होते. यातील आरोपी तिन्ही महिलांचे पूर्वीच लग्न झालेले असून अपत्य देखील आहेत. तिघी जणी मध्यप्रदेश मधून महाराष्ट्रात दाखल होऊन येथील नागरिकांची आर्थिक फसवणुक करत असल्याचे पोलिसांना सागितले. या टाेळीतील महिला एजंट आरोपी सरलाबाई अनिल पाटील, उषाबाई गोपाल विसपुते (दोघे रा. नांदेड ता. धरणगांव) यांनी उपवर तिन्ही मुलांच्या घरच्यांना विश्वासात घेत त्यांच्याशी लग्न लावून देण्याचे आमिष दिले. तसेच वेळोवेळी संपर्क करून, खोटे सांगुन लग्नासाठी उपवर तिन्ही मुलांच्या घरच्या व्यक्तिंकडून एकत्रीत 4 लाख 13 हजार रुपये उकळले. त्यातील मोना दादाराव शेंडे (वय-25 वर्षे), सरस्वती सोनु मगराज (वय-28), अन्वीनी अरुण थोरात (वय-26 वर्षे) याचे कासोदा गावांतील तील अविवाहीत तरूणांसोबत लग्न लावून देण्यात आले. मात्र वधुंची यापूवी लग्न झालेले आहे ही माहिती लपवून ठेवण्यात आली व वर मंडळांची आर्थिक फसवणुक करण्यात आली.
आंतरराज्य महिलांची टोळी जेरबंद करण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर-पवार, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगांव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंह राजपुत, सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील, पोलीस हेड कॉन्सटेबल राकेश खोंडे, पोलीस नाईक किरण गाडीलोहार, पोलीस कॉन्सटेबल इम्रान पठाण, पोलीस कॉन्सटेबल नितिन पाटील, सविता पाटील या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. जळगांव पोलीसांकडुन आवाहन करण्यात येत आहे की अशा फसवणुक करुन विवाह लावणाऱ्या टोळ्यांच्या भुलथापांना बळी न पळता खात्री करुनच विवाहाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. फसवणुक करण्याऱ्या टोळ्या सक्रिय असल्यास पोलीसांशी त्वरीत संपर्क करावा. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.