नोकरीच्या मुलाखतीचे ‘डूज अँड डोंटस्’

नोकरीच्या मुलाखतीचे ‘डूज अँड डोंटस्’

विधिषा देशपांडे

नोकरीच्या मुलाखतीसाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, तर काही गोष्टी टाळायच्या असतात. बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या तरीही मुलाखतीला जाताना काय बरोबर ठेवावे काय ठेवू नये हे फार महत्त्वाचे असते. दुसर्‍या शहरांमध्ये मुलाखतीसाठी जाताना तर या गोष्टी फारच कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. अनेक उमेदवारांच्या नोकरी मिळण्याच्या आशा या एका गोष्टीमुळे धूसर होतात.
या गोष्टी अवश्य घेऊन जाव्यात : कंपनीचा पत्ता आणि ओळखपत्र : नोकरीची मुलाखत दुसर्‍या शहरात असेल किंवा आपल्याच शहराच्या अनोळखी भागात असेल, तर ऑफिसचा पूर्ण पत्ता जवळ बाळगावा. शक्य असल्यास तो पत्ता गुगल मॅपवर लोड केल्यास जास्त बरे. त्याबरोबर आपले ओळखपत्रही बरोबर घेऊन जावे.
पेन आणि नोटपॅड किंवा डायरी : मुलाखतीला जात असलो तरीही काही वेळा मुद्दे लिहून घ्यावे लागू शकतात. त्यामुळे पेन आणि एखादे नोटपॅड किंवा लहान डायरी आपल्याकडे जरूर असली पाहिजे. लॅपटॉप किंवा टॅबलेट नेऊ नये. कारण, मुलाखत घेणारा आणि देणारा यांच्यामध्ये एक भिंत उभी राहते. स्मार्टफोनऐवजी नोटपॅडमध्ये नोटस् घेणे अधिक व्यावसायिक वाटते.
रेझ्युमेच्या जास्त प्रती : जाताना रिझ्युमे किंवा वैयक्तिक माहिती प्रत आपण जवळ बाळगायलाच हवी. त्याच्या जास्त प्रती असाव्यात. कारण, काही वेळा एकापेक्षा अधिक प्रत मागितली जाऊ शकते. शक्य असल्यास आपण केलेले काम सॅम्पल म्हणून बरोबर ठेवावे.
आपत्कालीन परिस्थितीशी निपटण्यासाठी तयारी : मुलाखतीला जाणे हा औपचारिक भाग आहे. त्यामुळे यावेळी काहीही चूक होता कामा नये याकडे कटाक्ष असावा. एखाद्या वेळी आपत्कालीन परिस्थितीशी निपटावे लागेल. त्यामुळे आपत्कालीन किट आपल्याबरोबर असावे. कपड्यांवर डाग लागले तर ते लपवण्यासाठी स्टेन स्टीकजवळ असावी. फोनचा चार्जर बरोबर असावा. जेणेकरून गरज भासल्यास दुसर्‍यांकडे मागावा लागणार नाही. डीयोची बॉटल, माऊथवॉश इत्यादीही आपल्या बरोबर असावे. मुलाखत दिवसभर होणार असेल, तर स्वतःसाठी काही सुके न्याहारीचे पदार्थही घेऊन जावे.
बॅग किंवा ब्रिफकेस : मुलाखतीला जाताना गरजेचे सामान घेऊन जाताना एक बॅग बरोबर ठेवावी. ब्रिफकेस किंवा व्यावसायिक दिसणारी बॅग असावी. तिचा रंग चमकदार नसावा.
* मुलाखतीदरम्यान काही गोष्टींचे
पथ्य पाळावे; अन्यथा आपली छाप चांगली पडणार नाही
मोबाईल फोन सायलेंटवर ठेवूनच मुलाखतीसाठी प्रवेश करावा.
सतत इअरफोन लावण्याची सवय असेल, तर तो काढून बॅगेत ठेवावा.
खूप गडद वासाचे परफ्यूम लावू नये.
धूम्रपानाची सवय असेल, तर सिगारेटचा वास येत नाही ना याची खात्री करावी.
स्त्री उमेदवारांनी फार जास्त मेकअप करू नये.
चालत जाताना चपलांचा आवाज होणार नाही किंवा जास्त आवाज करणारी पादत्राणे वापरू नयेत.
दुसर्‍या शहरातून आला असाल, तर सुटकेस बरोबर घ्यावी. ती रिसेप्शनवर ठेवावी. मुलाखतीच्या दालनात ती घेऊन जाऊ नये.