नागपूर : जिल्हयातील १८० शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्हयातील आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर तर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेअंतर्गत १८० शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला.
नागपूर शहर व नागपूर ग्रामीण भागातील विविध वाड्या, वस्त्या, झोपडपट्टी, आदिवासी पाडे आणि स्थलांतरित लोकांच्या वस्त्यांमध्ये विधी स्वयंसेवक मुकुंद आडेवार, मुखाहीद खान व राजरतन वानखेडे यांच्या पथकाने भेट दिली. त्यानंतर त्यांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली. यावेळी जिल्हा परिषदेचे बालरक्षक समन्वयक प्रसेनजित गायकवाड यांचाही या मोहिमेत सहभाग होता.
जास्तीत जास्त शाळाबाहय व शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रेरीत करण्यासाठी संबंधित शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. मोहिमेदरम्यान नागपूर शहरातील १०२ व ग्रामीण भागातील ७८ अशा शिक्षणापासून वंचित असलेल्या एकूण १८० बालकांना शाळेत प्रवेश देण्यात आला. त्यामध्ये कधीही शाळेत न गेलेले ५५ आणि मध्येच शाळा सोडलेले १२५ मुला-मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ३ मुले व २ मुली अपंग आहेत. सर्वेक्षण करतेवेळी शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले.
मोहिमेअंतर्गत गौतमनगर, गिट्टीगोदाम येथील दोन एकल पालक मुलींना शासनाच्या सावित्रीबाई फुले संगोपन योजनेची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विधी स्वयंसेवक पथकाने मदत केली. तसेच मुलांसाठी असलेल्या शासकीय शिष्यवृत्ती योजनांची देखील पालकांना माहिती देण्यात आली. मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव तथा न्यायाधीश सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे बालरक्षक समन्वयक प्रसेनजित गायकवाड, विधी स्वयंसेवक व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
हेही वाचा :
12th ISC Board : ठाण्यातील रेहान सिंग बारावीच्या आयएससी बोर्डात भारतात पहिला
सोशल मीडियावरील खोट्या पोस्टवर कारवाई होणार
अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी
Latest Marathi News नागपूर : जिल्हयातील १८० शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.