धुळ्यात कमिशन पोटी पन्नास हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकास अटक
धुळे Bharat Live News Media वृत्तसेवा- विकास काम मंजूर करण्याच्या मोबदल्यात कमिशनपोटी दोन लाखाच्या लाचेची मागणी करून यातील 50000 चा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकास धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे मौजे म्हसदी (प्र. नेर) येथील रहिवासी असुन त्यांची पत्नी म्हसदी (प्र. नेर) ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत. तक्रारदार यांची पत्नी अशिक्षित असल्याने त्यांच्या वार्डात विकासकामे मंजुर होण्याकरीता तक्रारदार हे सरपंच व ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांना वेळोवेळी भेटुन पाठपुरावा करीत होते.
तक्रारदार व त्यांची पत्नी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक बोरसे यांची भेट घेवुन त्यांची पत्नी सदस्य असलेल्या वार्डातील उर्दू शाळेस संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक व शाळेच्या मुला मुलींकरीता सुलभ शौचालयाच्या कामास मंजुरी मिळणेकरीता अर्ज देवुन त्यांना विनंती केली असता ग्रामसेवक बोरसे यांनी सदर कामाचे अंदाजपत्रिकेत १२,००,०००/- रुपये किमतीच्या २० टक्क्याप्रमाणे २,४०,०००/- रुपये काम घेणा-या इच्छुक ठेकेदाराकडुन आगाउ कमिशन घेवुन दयावे लागेल, असे तक्रारदार यांना सांगितले होते. तक्रारदार यांना ग्रामसेवक बोरसे यांना त्यांच्या मागणी प्रमाणे लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात समक्ष येवुन तक्रार दिली होती.
या तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आलोसे ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती २ लाख रुपये लाचेची मागणी करुन सदर रक्कमेपैकी ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे मान्य केले होते. आज सापळा आयोजित केला असता ग्रामसेवक बोरसे यांनी तक्रारदार यांचेकडे २ लाख रुपये पैकी पहिला हप्ता ५० हजार रुपये म्हसदी (प्र.नेर) ग्रामपंचायत कार्यालयात स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांचे विरुध्द साकी पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रविण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.
हेही वाचा-
Lok Sabha Election 2024 : पूर्णा तालुक्यात १४९०२१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क, निवडणूक विभागाची तयारी पूर्ण
Nashik Crime | धक्कादायक ! महिलेस घरात कोंडून आग लावत जीवे मारण्याचा प्रयत्न, संशयिताला बेड्या