अजित पवार पन्नास टक्के खोटे बोलतात: रोहित पवार

अजित पवार पन्नास टक्के खोटे बोलतात: रोहित पवार

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मला राजकारण करायचे होते म्हणून मी जिल्हा परिषदेसाठी आग्रही होतो. राज्यातील सर्व एबी फॉर्म देण्याची जबाबदारी ही अजित पवार यांच्यावर होती. त्यामुळे त्यांनी मला एबी फॉर्म दिला होता. मात्र, मी कधी अपक्ष निवडणूक लढणार नव्हतो. सध्या दादा 50 टक्के खरे आणि 50 टक्के खोटे बोलत आहेत. पूर्वी ते शंभर टक्के खरे बोलत असायचे. मात्र, भाजपच्या प्रभावामुळे आता ते 50 टक्क्यांवर आल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली.
पुण्यात बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना पवार बोलत होते. बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार सभेत भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना तिकीट देण्यासाठी शरद पवारांचा विरोध असताना देखील मी त्यांना एबी फॉर्म दिला, असा दावा केला होता. अजित पवारांच्या या दाव्यावर आता रोहित पवार यांनीच समाचार घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार खोटे बोलत असून, दहा दिवसांनंतर अजित पवार यांचे भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसारखे होईल. कारण, भाजप एक व्हायरस आहे आणि हा व्हायरस अजित पवारांना लागला, तर भविष्यात त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागेल, असे रोहित पवार म्हणाले.
पार्थ पवारांवर निशाणा
पार्थ पवार यांना कमी दर्जाची सुरक्षा दिलेली आहे. पंतप्रधान यांना जी सुरक्षा वापरली जाते, ती सुरक्षा द्यायला पाहिजे, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला.