बीड – पैठण उजवा कालवा फुटला, पाणीटंचाईत पाणी वाया
धोंडराई (बीड) – Bharat Live News Media वृत्तसेवा : गेल्या पंचवीस दिवसांपासून पैठण उजव्या कालव्यात अंत्यत कमी प्रमाणात जायकवाडी धरणात पाण्याची पातळी अत्यंत कमी झालेली आहे. परिणामी पाण्याचे स्रोत असलेल्या विहीर बोअरवेल यांच्या पाणीपातळीत देखील झपाट्याने घट झालेली आहे. जनावरे, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पैठण उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे. मात्र कालव्यातील पाणी वितरीका फुटून वाया जाते. आज गुरुवार दि. २६ एप्रिल रोजी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी गावाजवळ माळ्याचा ओढा म्हणून ओळख असलेल्या परिसरात उजवा कालवाच फुटला.
यामधून कित्येक क्युसेक पाणी वाया गेले आहे. अचानक कालवा फुटल्याने जवळील शेतवस्तीवर देखील पाणी घुसले व सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने या परीसरात शेत वस्तीवरील लोंकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कालव्यातील पाण्याचा प्रवाह गुळज येथून बंद केला असल्याचे समजते. मात्र, जलसंपदा विभागाने याक़डे वेळोवेळी लक्ष देणे गरजेचे आहे. याच कालव्यावर सी आर चार म्हणून सांडवा पर्याय आहे पण त्याचे दरवाजे वर-खाली घेण्याची कसलीही यंत्रणा ईथे सज्ज नाही ना,त्याची देखभाल करून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुविधा असत्या तर पाण्यावर नियंत्रण करता आले असते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
सदर घटना दुपारी १२ वा घडली. आम्ही दुसऱ्या शेतात काम करत होतो. आम्हाला आमचे बंधू सोमेश्वर यांनी सांगितले की, आपल्या घरासमोर कालवा फुटला आहे. जनावरांचा चारा कडबा गंज वाहून गेले. घरात धान्य होते ते इतरत्र हलवले. जनावरे दुसरेकडे बांधली. तोपर्यंत शेतात-ऊसात पाणी शिरले – ज्ञानेश्वर साखरे, शेतकरी, तळणेवाडी