तुतारीबाबत आधीच आक्षेप का घेतला नाही? निवडणूक आयुक्त
मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : ट्रम्पेट हे मुक्त चिन्ह आहे. त्याला आक्षेप घ्यायचा होत तर तो निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी का घेतला गेला नाही, अशी विचारणा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान केली.
बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस हे आहे. तर एका अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. मात्र या चिन्हाच्या मराठी भाषांतरात तुतारी असे लिहिण्यात आले आहे. त्याला सुप्रिया सुळे यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्याबद्दल विचारले असता चोक्कलिंगम म्हणाले, ट्रम्पेट हे मुक्त चिन्ह आहे. आक्षेप घ्यायचाच होता तर तो निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी घ्यायला हवा होता.
एकदा मुक्त निवडणूक चिन्ह दिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्याला त्यात बदल करता येत नाही. ही मुक्त चिन्हे काही आताच आलेली नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून आहेत. तसेच मराठी भाषांतर देखील खूप आधीच करण्यात आले आहे. मात्र, मतदान करतेवेळी बॅलट युनिटवर फक्त चिन्हच दिसते, त्यात शब्द दिसत नाही. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बच्चू कडू यांच्याकडून जि.प.चीच संमती
अमरावतीमध्ये मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू यांनी केलेल्या राड्याबद्दल विचारले असता चोक्कलिंगम म्हणाले, अशा परवानग्या देण्यासाठी वन विंडो सिस्टिम तयार करण्यात आली आहे. सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणा या माध्यमातून परवानगी देतात. हे मैदान जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येते त्यांनी फक्त जिल्हा परिषदेची संमती घेतली होती. इतर यंत्रणांची नव्हती त्यामुळे हा प्रकार झाला.