यवतमाळ: पोलिसात तक्रार केल्याचा रागातून शेजाऱ्याचा खून

यवतमाळ: पोलिसात तक्रार केल्याचा रागातून शेजाऱ्याचा खून

यवतमाळ; Bharat Live News Media वृत्तसेवा : यवतमाळ शहरातील संकटमोचन परिसरात घराशेजारी राहणाऱ्या मुलाची सतत शिवीगाळ करतो म्हणून महिलेने १८ एप्रिल रोजी सायंकाळी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी याची दखल घेऊन थेट युवकाचे घर गाठले. मात्र तो युवक घरातून पसार झाला. तक्रार दिल्याचा राग धरून त्या युवकाने थेट महिलेच्या टेलर पतीवर चाकूने वार करून खून केला. त्यानंतर महिला व मुलीवरही हल्ला केला. नागरिक गोळा झाल्याने युवकाने पळ काढला. ही घटना शुक्रवारी (दि.१९) रात्री घडली. यातील आरोपी पसार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.
संशयित आरोपी महेश भीमराव टेकाम (वय ३०) हा कलर पेंटिंगचे काम करत होता. त्याच्या घरी आई व दोन अविवाहित बहिणी आहेत. त्याच्या शेजारी राहणाऱ्या प्रिया अनिल गवई या महिलेशी वाद झाला. याची तक्रार महिलेने गुरुवारी सायंकाळी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात केली. त्या युवकाला पोलिसांनी समज देऊन तोडगा काढावा, अशी महिलेची मागणी होती.
त्यामुळे गुरुवारी पोलिस महेशच्या घरी पोहोचले, तेव्हा तो घरी नव्हता. त्याला घरी पोलिस आल्याचे समजताच तो गुरुवारी रात्रभर घरीच आला नाही, शुक्रवारी दिवसभरही घराकडे फिरकला नाही. थेट शुक्रवारी रात्री त्याने अनिल नारायण गवई (वय ५३) यांच्यावर चाकूने हल्ला केला. गळ्यावरच चाकूने वार झाल्याने अनिल जागेवर कोसळला. तो टेलरिंगचे दुकान बंद करून जात असताना हा प्रकार घडला. अनिल निपचित पडल्याचे पाहून महेश अनिलच्या घरी पोहोचला. तेथे त्याने प्रिया गवई व तिची मुलगी स्नेहा (वय १५) हिच्यावर चाकूने वार केले. दोन्ही माय-लेकी जीवाच्या आकांताने ओरडल्याने शेजारी धावून आले. त्यामुळे हल्लेखोर महेशने तेथून पळ काढला. याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी महेश टेकाम याच्या विरोधात खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील आरोपी हा घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
हेही वाचा :

सिंधुदुर्ग: तिलारी घाटात आंध्रप्रदेशातील पर्यटकांची कार जळून खाक
Pakistan Flood: पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे पुराचा कहर; आणखी १३ जणांचा मृत्यू
नाशिक : कंटेनर – मोटरसायकल अपघातात तीन ठार, नांदूर शिंगोटेच्या दोघांचा समावेश