कोल्हापूर : कळंबा जेलमध्ये पुन्हा मोबाईल; कैद्यावर गुन्हा
कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात कळंबा कारागृहातील न्यायाधीन बंदी असलेल्या कैद्याकडे रविवारी सकाळी तपासणीत सुरक्षा रक्षकांना मोबाईल आढळून आला. अंडर ट्रायल कैदी शिवाजी हनुमंत घोडके याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारागृह शिपाई अरविंद गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. सर्कल क्रमांक 3 बरॅक 1, 2, 3 व 4 साईटजवळील शौचालयाजवळ मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. 5 हजार रुपये किमतीच्या मोबाईलमध्ये सिमकार्ड व बॅटरी आढळून आल्याने पोलिसांनी संशयिताकडे सखोल चौकशी सुरू केली आहे. संबंधित मोबाईल कोणामार्फत कारागृहात आणण्यात आला. आजवर कितीवेळा त्याचा वापर झाला. कोणा- कोणाशी संपर्क झाला. याचीही चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.