महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेले इंजिन: देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेले इंजिन: देवेंद्र फडणवीस

किनवट, Bharat Live News Media वृत्तसेवा : महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेले इंजिन आहे. त्यातील प्रत्येकजण स्वत:लाच इंजिन समजत असल्यामुळे प्रत्येकाची वेगळी दिशा झाली आहे. त्यामुळे त्याला गंतव्यच नाही. याउलट महायुतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव इंजिन असून त्याला आपण वेगवेगळ्या पक्षाचे डबे जोडल्यामुळे ही गाडी विकासाच्या दिशेने सुसाट धावत आहे. देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी वैश्विक नेतृत्व गरजेचे आहे. ते सामर्थ्य केवळ विकासपुरुष नरेंद्र मोदींमध्येच आहे. म्हणून मी व्यक्ती व पक्षाकरिता मत मागायला आलो नसून देशाच्या सुरक्षित भवितव्याकरिता अर्थात मोदींसाठी मत मागायला आलो आहे. त्यामुळे यावेळी व्यक्ती वा पक्ष न पाहता केवळ देशहितासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हिंगोली लोकसभेसाठी महायुतीतील शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ आज (दि.21) सायंकाळी चार वाजता शहरातील हुतात्मा गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार भीमराव केराम, हिंगोली मतदारसंघाचे प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर, डॉ.अशोक पाटील सूर्यवंशी, आ. नामदेव ससाणे, ॲड.शिवाजी माने, सुधाकर भोयर, श्यामभारती महाराज, संध्याताई राठोड, अशोक नेम्मानीवार आदीसह शिवसेना, भाजपा, रा.काँ.व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले की, विरोधक आमच्या ‘अब की बार 400 पार’ च्या नाऱ्यामुळे घाबरले आहेत.  ‘चारसो पार’ ची घोषणा ही संविधान बदलण्यासाठी असल्याची आवई उठवीत आहेत. मात्र, त्यात तथ्य नसून, चंद्र-सूर्य असेपर्यंत भारताचे संविधान कुणी बदलू शकत नाही. आणि मोदी बदलूही देणार नाहीत, याची ग्वाही त्यांनी दिली.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत 25 कोटी लोकांना दारिद्य रेषेच्यावर आणले आहे. गरीबांसाठी घरकुल योजना, मोफत गॅस, शौचालय, हर घर नल, जनधन योजना, वयोश्री योजना, तांडा विकास योजना, आदिवासींकरिता विविध योजना आदींचा पाढा वाचून यासाठी किती लाख कोटी रुपयांचा निधी वितरित केला गेला. बेरोजगार युवकांसाठी विनातारण मुद्रालोन आदींचाही त्यांनी उहापोह केला.
 या सभेसाठी पाच हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. 40 अंश तापमान असल्यामुळे अल्पावधीत सुसज्ज शामियाने व आसन व्यवस्था करण्यात आल्यामुळे व थंड पाण्याची व्यवस्था केल्यामुळे आयोजकांच्या नियोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले.
हेही वाचा 

उद्धव ठाकरेंना वेड लागलेय, मला लागलेले नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची मागणी वाढली; केरळ, कर्नाटकसह राज्यात १२५ सभांचे नियोजन
सुप्रिया सुळे समर्थक दशरथ मानेंच्या घरी देवेंद्र फडणवीस यांची भेट