बुडबुड्यात ठेवून सेकंदांमध्ये सोडवले रुबिक्स क्यूब
मुंबई : रुबिक्स क्यूबचे कोडे सोडवण्याचे अनेक प्रकारचे विक्रम देश-विदेशात झाले आहेत. अगदी पाण्याखाली बसूनही रुबिक्स क्यूब सोडवण्याचा विक्रम आहे. आता एका व्यक्तीने चक्क साबणाच्या मोठ्या बुडबुड्यात रुबिक्स क्यूब ठेवून हे कोडे काही सेकंदात सोडवून दाखवले आहे आणि जगभरातील विक्रमांची नोंद करणार्या ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये स्वतःचे नाव कोरले आहे.
‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’सने एक व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईतील सायबर सुरक्षातज्ज्ञ चिन्मय प्रभू यांनी 32.69 सेकंदात रुबिक क्यूबचे कोडे सोडवून दाखवले आहे. पण एवढेच नाही, तर या तरुणाने साबणाच्या पाण्याचे एक वर्तुळ (बुडबुडा) तयार करून हे कोडे सोडवून दाखवले आहे. व्हिडीओत दिसते की, चिन्मय प्रभू एका टेबलावर साबणाच्या पाण्याचा एक मोठा बुडबुडा तयार करून अलगद त्यामध्ये क्यूबचे कोडे सरकवतो.
तसेच तुम्हाला आश्चर्य वाटेल की, तरुणाने यादरम्यान साबणाचा बुडबुडा फुटू न देता, फक्त 32 सेकंदात हे कोडे सोडवून दाखवले. वेळ नमूद करण्यासाठी त्याने मागे टायमरसुद्धा लावला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये भारतीय तरुणाचे कौतुक करण्यात आले आहे. अनेक नेटकरी या तरुणाचे अनोखे कौशल्य पाहून थक्क होत आहेत आणि कमेंटमध्ये विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत.