किस्से निवडणुकीचे : कालचे विरोधक, आज प्रचारक
– संदीप रोडे, नगर
राजकारणात कोणी कोणाचा मित्र असतो ना शत्रू, असं नेहमीच म्हटलं जातं. नगरमध्ये त्याचे प्रत्यंतर आले आहे. गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात लढले; पण काळाचा महिमा अगाध म्हणतात, तसं आता तेच विरोधक प्रचारक बनले आहेत. नगरमधून खा. सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, तर शिर्डीत खा. सदाशिव लोखंडेंविरोधात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे काँग्रेसकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढले. जगताप, कांबळे यांचा पराभव झाला. पुढे राज्यात शिवसेना फुटली अन् भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. नंतर राष्ट्रवादी फुटली, सत्तेत सहभागी झाली. अजित पवारांसोबत असलेले आ. संग्राम जगताप महायुतीचे घटक झाले. ‘हात’ सोडून शिवसेनेत गेलेेले भाऊसाहेब कांबळे यांनी उबाठा सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे सेनेत प्रवेश केला. अर्थात, दोघांनीही आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते समोर ठेवलेली आहेत. (Lok Sabha Elections 2024)
यंदाच्या 2024 लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून शिंदे सेनेने खा. सदाशिव लोखंडे, तर नगरमधून भाजपने सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी दिली आहेे. महायुतीचा धर्म म्हणून जगताप, कांबळे या दोघांनाही गतवेळच्या विरोधकांचा प्रचार करण्याची वेळ आली. महायुती झाल्यानंतर विखे-जगताप यांची मैत्री अधिक घट्ट झाली. परिणामी, जगताप यांच्यावर तर महायुतीचे निवडणूक समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. जगताप-कांबळे यांच्यावर प्रचाराची जबाबदारी आल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे चित्र आहे. दोघेही विरोधक मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या खांद्याला खांदा लावत प्रचारात उतरले आहेत. भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर विधानसभा, तर संग्राम जगताप यांनी नगर शहर विधानसभा मतदार संघाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत तेव्हाच्या विरोधकांना लीड देण्यासाठी कंबर कसली आहे. राजकारणात शत्रू आणि मित्र कायमचे कोणी नसते, हेच खरे! (Lok Sabha Elections 2024)
Latest Marathi News किस्से निवडणुकीचे : कालचे विरोधक, आज प्रचारक Brought to You By : Bharat Live News Media.