जळगाव, रावेरमध्ये भाजपसमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान; वंचितची वेगळी चाल
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यामध्ये आजच्या घडीला भाजपातून बाहेर पडलेल्या दोघाही उमेदवारांनी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश घेऊन भाजपा समोर म्हणजेच महायुती समोर आव्हान उभे केले आहे. जळगाव मध्ये स्मिता वाघ यांच्याविरुद्ध करण पवार तर रावेर लोकसभेमध्ये रक्षा खडसे यांच्या समोर श्रीराम पाटील यांनी आव्हान दिले आहे. अशातच रावेर लोकसभेमध्ये महायुती व महाविकास आघाडी या दोघाही पक्षांच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने आव्हान दिलेले आहे.
लोकसभा सार्वत्रिक 2024 च्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पहिल्या यादीमध्येच भाजपाने आघाडी घेत जळगाव लोकसभा व रावेर लोकसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केले. विद्यमान खासदारांना झटका देऊन त्यांनी माजी आमदार स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी दिली तर विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा भाजपाने संधी देऊन रावेर लोकसभेमध्ये उमेदवार बदलीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
महायुतीच्या भाजपा पक्षाने दोन्ही उमेदवार जाहीर केल्यानंतरही महाविकास आघाडीतील पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले नव्हते. यामध्ये महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला जळगाव लोकसभा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रावेर लोकसभेची जागा मिळाली. दोन्ही पक्षांमध्ये अनेक इच्छुकांची रांग होती मात्र शेवटी जळगाव लोकसभेसाठी भाजपातून फुटलेले उमेश पाटील यांचे मित्र करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली. तर रावेर लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोण लढेल असा प्रश्न असताना भाजपामध्ये नुकतेच प्रवेश केलेले श्रीराम पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. या दोन्ही उमेदवारांनी भाजपाला चांगलेच कडवे आव्हान देण्यात यश येईल अशी चिन्हे दिसू लागलेली आहे.
भाजपाने महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित होत नसल्याचे पाहत प्रचारालाही सुरुवात केली आहे. बैठका, चर्चा, मेळावे यांचा सपाटा लावला आहे. आता महाविकास आघाडीतील उमेदवारांची नावे जाहीर झाल्यावर त्यांनी सुद्धा बैठका घेणे सुरू केले आहेत.
भाजपने लोकसभेच्या दोन्ही जागांवर महिला उमेदवार दिल्यामुळे दोघाही पक्षांनी पुरुष उमेदवार दिले आहेत. यामुळे रावेर व जळगाव लोकसभेमध्ये महिला विरुद्ध पुरुष असा सामना रंगणार आहे. रावेर लोकसभेत रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील तर जळगाव लोकसभेमध्ये स्मिता वाघ विरुद्ध करण पवार यांच्या लढत होणार आहे. ही सरळ लढत होत असताना रावेर लोकसभेमध्ये भाजपाच्या व आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने आव्हान दिलेले आहे. त्यांनी अभियंता संजय ब्राह्मणे यांना रावेर लोकसभेतून तिकीट दिले आहे. मात्र जळगाव लोकसभेसाठी अजूनही वंचित बहुजन आघाडीला कोणी उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळे आता नामनिर्देशन भरण्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यावेळी अजून कोण कोण रिंगणात उतरणार हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा –
Zombie Drug | नशाबाजीसाठी कबरी खोदून मानवी हाडांची चोरी; ‘या’ आफ्रिकन देशात राष्ट्रीय आणीबाणी
बीड : तहसीलदारांची विद्युत मोटर जप्तीची कारवाई; गावकऱ्यांचा विरोध, आमदारांची मध्यस्थी
Gold Prices Today | सोने ७२ हजार पार, चांदीही चमकली! दरवाढीचे कारण काय?
Latest Marathi News जळगाव, रावेरमध्ये भाजपसमोर महाविकास आघाडीचे कडवे आव्हान; वंचितची वेगळी चाल Brought to You By : Bharat Live News Media.