बदलापूरकरांना रेल्वेसह मेट्रोचीही सुविधा देणार : उपमुख्यमंत्री फडणवीस
बदलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबई आणि उपनगरातील बदलापूरपर्यंत विस्तारित झालेल्या भागाला रेल्वेच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी येथील नागरिक आग्रही आहेत. रेल्वेची सुविधा उत्तम दर्जाची देण्याबरोबरच या भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रोचीही सेवा लवकरच उपलब्ध करून देणार असून त्याला येत्या काही दिवसात मंजुरी देणार असल्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.९) बदलापूरातील कार्यक्रमात दिले.
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या बदलापूर येथील नवीन कार्यालयाचा शुभारंभ आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यालयाच्या उद्घाटनाबरोबरच कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी रेल्वे आणि मेट्रो सेवांवर विशेष भर दिला असून लवकरच बदलापूरचाही प्रश्न मार्गी लागेल. यासाठी राज्य शासनाकडून जी मदत लागेल, ती करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच नागरिकांना दळणवळण सोपे व्हावे, यासाठी मेट्रो सेवाही मंजूर करून ती सेवाही बदलापूर आणि उपनगरातील प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या मेळाव्याला भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील, कल्याणचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व कल्याण परिसरातील विविध आमदार आणि महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
मनसेने महायुतीला पाठींबा दिल्यानंतर सीएम शिंदेची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘राज ठाकरेंचे आभार, आता विधानसभेसाठी…’
Ramdas Athawale : …तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल : रामदास आठवले
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ म्हणाले, मतदान करा अन् अयोध्येला या…
Latest Marathi News बदलापूरकरांना रेल्वेसह मेट्रोचीही सुविधा देणार : उपमुख्यमंत्री फडणवीस Brought to You By : Bharat Live News Media.