जुन्नरचे नाव शिवनेरच; पुरावे सापडले : तालुक्याचे नाव शिवनेर करण्याची जनतेची मागणी
ओतूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हा जुन्नर शहरालगतच असून, यापूर्वी जुन्नर तालुक्याचे नाव हे शिवनेर तालुका असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे जुन्नरचे नाव बदलून ते शिवनेर तालुका, असे करण्याची जोरदार मागणी जनतेतून होऊ लागली आहे. सोशल मीडियावर देखील ही मागणी जोरकसपणे करण्यात आली आहे.
जीर्ण वास्तूंचे शहर म्हणून तालुक्याला जुन्नर हे नाव पडले असावे; मात्र, या नावात तितकेसे तथ्य वाटत नसल्याचे शिवप्रेमींचे म्हणणे आहे. सन 1861 पूर्वी जुन्नर तालुक्याचे नाव शिवनेर तालुका असल्याचे भारतीय पुरातत्व विभागातून काढलेल्या देवस्थानांच्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. सर जॉर्ज रसल, गव्हर्नर ऑफ बॉम्बे यांनी 22 नोहेंबर 1861 रोजी ओतूर येथील देवस्थानांच्या देखभाल, पूजाअर्चा करणार्या त्या-त्या समाजाला देवस्थानांच्या कायमस्वरुपी सनदा प्रदान केल्या आहेत. त्यात मार्तंड देवस्थान परीट समाजाकडे, लक्ष्मी नारायण मंदिर बैरागी यांच्याकडे, पांडुरंग मंदिर ब्राह्मण समाजाकडे, श्री कपर्दिकेश्वर महादेव मंदिर गुरव समाजाकडे अशी त्या सनदेत म्हटले आहे. या सर्व देवस्थानांसाठी मिळून एक ठराविक सनद देण्यात आली. त्या सनदेत जुन्नरचे पूर्वीचे नाव हे शिवनेर तालुका असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
त्याशिवाय 22 सप्टेंबर 1854 रोजी देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनीची गुरव समाजातील पूर्वज साळू बालाजी गुरव यांनी तयार केलेल्या कैफियतमध्ये देखील जुन्नरचे नाव शिवनेर तालुकाच असल्याचा स्पष्ट उल्लेख निदर्शनास आला आहे. तसेच गुरव समाजाकडे असलेल्या लँड एलिकेशन प्रतवर देखील जुन्नरचे नाव पूर्वी शिवनेर तालुका असल्याचे नमूद आहे. छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानामुळे शिवनेर या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे जुन्नर या नावात बदल करून शिवनेरी तालुका असे नामकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी होऊ लागली आहे.
हेही वाचा
शिवनेरीवर कचरा कमी होऊ लागला; प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी
हिंगोली : कार-दुचाकी अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू
ईटीबीपीएस माध्यमातून होणार जिल्ह्यातील मतदान; काय आहे ईटीबीपीएस?
Latest Marathi News जुन्नरचे नाव शिवनेरच; पुरावे सापडले : तालुक्याचे नाव शिवनेर करण्याची जनतेची मागणी Brought to You By : Bharat Live News Media.