‘तारादूत’ पुन्हा बंद! प्रकल्पाबाबत शासनच उदासीन; गरजवंत मराठा समाज वंचित

‘तारादूत’ पुन्हा बंद! प्रकल्पाबाबत शासनच उदासीन; गरजवंत मराठा समाज वंचित

सुनील जगताप

पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) वतीने मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच शाश्वत विकासासाठी सारथीच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी तारादूत प्रकल्प सुरू केला. मात्र, हा प्रकल्प पुन्हा बंद पडला आहे. यासंदर्भात हा प्रकल्प शासनाकडूनच बंद करण्यात आल्याची  माहिती सारथीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.
सारथीच्या वतीने ऑगस्ट 2019 मध्ये आठ विभागांसाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. तारादूत म्हणून नियुक्त होणारे स्वयंसेवक हे पदवीधर असणे अनिवार्य आहे.

सामाजिक जाणीव, थोर-महापुरुषांच्या विचारांची माहिती, ज्ञान असलेल्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प केवळ दोन वर्षांसाठी होता. त्यासाठी 11 महिन्यांचा करार करून दरमहा 18 हजार रुपये मानधन दिले जाणार होते. या विभागनिहाय भरतीमध्ये पुणे 160, कोल्हापूर 200, लातूर 156, छत्रपती संभाजीनगर 152, नाशिक, 160, मुंबई 136 आणि नागपूर येथे 252 तारादूतांची नियुक्ती केली होती. मात्र, हा प्रकल्प  पुन्हा सुरू करण्याची मागणी विविध मराठा संघटनांनी  केली आहे.

सारथीची स्थापना होऊन पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु, मराठा समाजाच्या हितासाठी व मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेल्या या संस्थेचा फायदा तळागाळातील गरजवंत मराठा समाजाला अजूनही झालेला नाही. सारथीच्या योजना अजूनपर्यंत समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचलेल्या नाहीत, याला कारणीभूत सारथीचे संचालक मंडळ आहे. बार्टीच्या धरतीवर सर्व योजना लागू करताना समतादूतसारखा महत्त्वाचा प्रकल्प जो बार्टीच्या यशाचा कणा आहे, अशा प्रकारचा तारादूत प्रकल्प सारथीने पहिल्यापासून नाकारला आणि यामुळेच आज मराठा समाजातील तळागाळामधील विद्यार्थ्यांना या योजनेबद्दल कोणतीही माहिती नाही.

– सचिन आडेकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, पुणे शहर

सारथीचा तारादूत प्रकल्प हा शासनाकडूनच बंद केला आहे. हा प्रकल्प बंद केला असला तरी सारथीच्या विविध योजना गावपातळीपर्यंत पोहचविण्याचे काम तहसीलदारांमार्फत होत आहे. यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांची जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि गांधी जयंतीनिमित्त गावपातळीवर होणार्‍या ग्रामसभेच्या माध्यमातूनही सारथीच्या योजना पोहचविण्याचे काम सारथीच्या वतीने सुरू आहे.

– अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, सारथी

हेही वाचा

राज्यात पुढील काळात 12 समूह विद्यापीठे..
सहकार क्षेत्रावरचा विश्वास पुन्हा वाढतोय!
पक्षाने उमेदवारी दिल्यास लढण्यास तयार : नारायण राणे

Latest Marathi News ‘तारादूत’ पुन्हा बंद! प्रकल्पाबाबत शासनच उदासीन; गरजवंत मराठा समाज वंचित Brought to You By : Bharat Live News Media.