पिंपरी : चिखली येथे तीन वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू

पिंपरी : चिखली येथे तीन वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू

पिंपरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : घराच्या अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने चिमुरड्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. चिखली येथे सोमवारी (दि. १) ही घटना घडली.
वसीम नजीमुद्दीन खान, असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नजीमुद्दीन खान त्यांच्या पत्नी व मुलांसह चिखली येथे मोरे पाटील चौक परिसरात अंतर्गत भागात पाल टाकून राहतात. नजीमुद्दीन हे भंगार गोळा करण्याचे काम करतात. त्यांना चार मुले आहेत. त्यांचा तीन वर्षीय मुलगा वसीम हा त्याच्या मित्रांसोबत सोमवारी सायंकाळी त्याच्या घराच्या परिसरात खेळत होता. त्यावेळी तेथील एका शेतातील विहिरीमध्ये पडला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी हा प्रकार घरच्यांना सांगितला. वसीमच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. चिखली पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, सुमारे ३० फूट खोल विहिरीतील पाणी उपसण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा पंप लावला. तसेच, मंगळवारी सकाळी अग्निशामक दलाच्या पथकांना पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने चिखली पोलिसांनी विहिरीमध्ये वसीमचा शोध घेतला. त्याचा मृतदेह मंगळवारी (दि. २) दुपारी साडेचारच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) शवविच्छेदन करण्यात आले. तपास चिखली पोलिस करत आहेत.
Latest Marathi News पिंपरी : चिखली येथे तीन वर्षीय चिमुरड्याचा विहिरीत पडून मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.