Byju’s ची एका फोनवरून नोकरकपात, शेकडो कर्मचाऱ्यांना धक्का
Bharat Live News Media ऑनलाईन : दिग्गज एडटेक कंपनी बायजूने (Byju’s) पुन्हा एकदा नोकरकपात सुरु केली आहे. आताच्या नव्या नोकरकपातीच्या फेरीत १०० ते ५०० कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः कंपनीच्या विक्री विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाण्याची शक्यता आहे.
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, Byju’s ने केवळ एका फोन कॉलवरून त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. बायजूमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या कुटुंबातील एका सदस्य आजारी असल्याने त्याची काळजी घेण्यासाठी सुट्टी घेतली होती. पण ३१ मार्च रोजी अचानक त्याला एचआरने फोन करून त्याला कामावरून काढून टाकल्याचे सांगितले. त्याची सेवामुक्त होण्याची प्रक्रिया तत्त्काळ सुरू केली असून त्याच दिवशी त्याचा शेवटचा कामाचा दिवस असेल, असे HR ने त्याला कळवले.
सदर कर्मचाऱ्याने कामावरून काढून टाकण्याचे कारण विचारले असता, एचआरने कंपनीच्या खराब आर्थिक स्थितीचा उल्लेख केला. पुढे असे नमूद केले की, कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटने काही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून सदर कर्मचाऱ्याला धक्का बसला.
अडचणीत सापडलेल्या एडटेक कंपनी बायजूने केवळ एका फोन कॉल्सवर नोकरकपात सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन (पीआयपी) वर न ठेवता अथवा त्यांना नोटीस पिरियड न देता त्यांना सोडून जाण्यास सांगितले जात असल्याचे वृत्त मनीकंट्रोलने सुत्रांनी हवाल्याने दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नोकरकपातीच्या फेरीत १०० ते ५०० कर्मचाऱ्यांना फटका बसू शकतो. बायजूने गेल्या दोन वर्षांत सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कारण कंपनीला कमी होत चाललेला निधी आणि गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांसोबत कायदेशीर संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, Byju इंडियामध्ये जवळपास १४ हजार कर्मचारी payroll वर काम करतात.
नोकरकपातीचे दिले कारण
दरम्यान, बायजूच्या प्रवक्त्याने या नोकरकपातीची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, ” आम्ही ऑपरेटिंग स्ट्रक्चर्स सुलभ करण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि रोख प्रवाहाचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये जाहीर केलेल्या व्यवसाय पुनर्रचना प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आहोत.” प्रवक्त्याने पुढे असेही म्हटले की, “सध्या सुरू असलेल्या कायदेशीर बाबींमुळे आम्ही एका विलक्षण परिस्थितीतून जात आहोत. प्रत्येक कर्मचारी आणि इकोसिस्टम सध्याच्या परिस्थितीमुळे प्रचंड तणावातून जात आहे.”
हे ही वाचा :
बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांचा माफीनामा सुप्रीम कोर्टाने फेटाळला
निवडणूक आणि शेअर बाजाराची दिशा, गुंतवणूक कशी करावी?
अर्थवार्ता- निफ्टीमधील ५० पैकी ‘या’ ४८ समभागांत वाढ
Latest Marathi News Byju’s ची एका फोनवरून नोकरकपात, शेकडो कर्मचाऱ्यांना धक्का Brought to You By : Bharat Live News Media.