अकोल्यात प्रकाश आंबेडकर विरुद्ध अभय पाटील; कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून अकोला लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे डॉ. अभय पाटील विरुद्ध वंचितचे प्रकाश आंबेडकर विरुद्ध भाजपचे अनुप धोत्रे अशी तिरंगी लढत अकोल्यात होणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सात ठिकाणी पाठिंबा देऊ केल्यानंतर अकोल्यामध्ये काँग्रेस उमेदवार देणार नाही अशा चर्चा होत्या, त्यालाही यानिमित्ताने पूर्णविराम मिळाला. दुसरे यादीमध्ये महाराष्ट्रातून डॉ. अभय पाटील यांच्यासह तेलंगणाच्या वारंगलमध्ये कदीयम काव्या यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शिवसेना ठाकरे गट हे पक्ष महाविकास आघाडीत एकत्र आहेत. त्यात वंचित बहुजन आघाडी सामील होईल असे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू होते मात्र तसे होऊ शकले नाही. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. त्यापैकी कोल्हापुरात शाहू महाराज आणि नागपुरात विकास ठाकरे या काँग्रेसच्या दोन उमेदवारांना त्यांनी पाठिंबा जाहीरही केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर सात जागांवर वंचितचा पाठिंबा मिळणार असल्याने काँग्रेस पक्ष प्रकाश आंबेडकरांच्या विरुद्ध उमेदवार देणार नाही अशा चर्चा होत्या. दरम्यान, प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून लढणार हे त्यांनी यापूर्वीच त्यांनी घोषित केले होते. त्यामुळे काँग्रेस उमेदवार देणार की नाही याबद्दलची उत्सुकता होती. अखेर काँग्रेसने अकोल्यामध्ये डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अकोल्यात काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध वंचित अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने उमेदवार दिल्याने वंचितची भूमिका वेगळी असेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Latest Marathi News अकोल्यात प्रकाश आंबेडकर विरुद्ध अभय पाटील; कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.
