शरद पवार यांनी घेतली मल्लिकार्जून खर्गेंची भेट; हरयाणामधील करनालच्या जागेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : हरयाणाच्या करनाल लोकसभा मतदारसंघात रोड मराठा समाजातील मतदारांची संख्या जास्त असल्याने इंडिया आघाडीत ही जागा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडावी, या मागणीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. याबाबत उभय नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
करनाल लोकसभेच्या जागेवर हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवित आहेत. खट्टर यांच्याविरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी काँग्रेसने इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्या १० राजाजी मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. करनाल मतदारसंघात रोड मराठा समाजाची लोकसंख्या जास्त असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांच्यावर प्रभाव आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत ही जागा आमच्यासाठी सोडावी, अशी मागणी शरद पवार यांनी खर्गे यांच्याकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) हरयाणा प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र वर्मा हे मनोहरलाल खट्टर यांना चांगली लढत देऊ शकतील, असे शरद पवार यांनी खर्गे यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस पक्षाकडून हरयाणा विधानसभेचे माजी अध्यक्ष कुलदीप शर्मा यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.
Latest Marathi News शरद पवार यांनी घेतली मल्लिकार्जून खर्गेंची भेट; हरयाणामधील करनालच्या जागेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा Brought to You By : Bharat Live News Media.