वेध लोकसभेचे; डॉ. व्यंकटेश काब्दे, ढाकणे यांचे अनपेक्षित विजय

1989 च्या लोकसभा निवडणुकीत जनता दल आणि विरोधकांना काहीसे अनुकूल वातावरण होते. त्यात मराठवाड्यातील तीन जागा वगळता उर्वरित पाच जागा विरोधकांना मिळाल्या. त्यामधील नांदेड येथून जनता दलाचे उमेदवार डॉ. व्यंकटेश काब्दे, बीड मतदारसंघात बबनराव ढाकणे हेे जनता दलाच्या तिकिटावर निवडून आले. हे दोन्ही विजयी भल्याभल्यांना चकित करणारे ठरले. कारण डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी सिटींग एमपी … The post वेध लोकसभेचे; डॉ. व्यंकटेश काब्दे, ढाकणे यांचे अनपेक्षित विजय appeared first on पुढारी.

वेध लोकसभेचे; डॉ. व्यंकटेश काब्दे, ढाकणे यांचे अनपेक्षित विजय

उमेश काळे

1989 च्या लोकसभा निवडणुकीत जनता दल आणि विरोधकांना काहीसे अनुकूल वातावरण होते. त्यात मराठवाड्यातील तीन जागा वगळता उर्वरित पाच जागा विरोधकांना मिळाल्या. त्यामधील नांदेड येथून जनता दलाचे उमेदवार डॉ. व्यंकटेश काब्दे, बीड मतदारसंघात बबनराव ढाकणे हेे जनता दलाच्या तिकिटावर निवडून आले. हे दोन्ही विजयी भल्याभल्यांना चकित करणारे ठरले. कारण डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी सिटींग एमपी अशोक चव्हाण यांचा तर ढाकणे यांनी दोन टर्म खासदार असणार्‍या केशरकाकूंचा पराभव केला होता. या निवडणुकीत नांदेडला फारशी ताकद नसल्याने भाजपने उमेदवार उभा केला नव्हता. डॉक्टरांना 278,320 तर अशोक चव्हाण यांना 254,207 मते पडली. 24 हजार मतांनी चव्हाण या निवडणुकीत पराभूत झाले होते. (Lok Sabha Election 2024)
अमेरिकेतून नांदेडात स्थायिक
हृदयरोगत तज्ञ असलेले  डॉ.  काब्दे हे अमेरिकेत उच्च शिक्षण व काही काळ शिकागोत व्यवसाय करून नांदेडात स्थायिक झाले होते. मायदेशाविषयी असणारी ओढ मला परत घेवून आली, असे  काब्दे म्हणतात.  छोटीमोठी सामाजिक कार्ये ते करीत असत. पण राजकारण हा काही त्यांचा पिंड नव्हता. चव्हाण पितापुत्रांचा नांदेडातील दबदबा पाहता विरोधकांसमोर प्रबळ उमेदवारही नव्हता. याबाबत बोलताना Bharat Live News Mediaचे नांदेड येथील विशेष प्रतिनिधी संजीव कुलळकर्णी म्हणाले, की कंधार, हदगाव, बिलोलीचा काही भाग वगळता जनता दलाशी पूरक असणारा मतदार फारसा नव्हता. तरीपण उमेदवार कोण असावा यावर स्थानिक जनता दल नेत्यांचे विचारमंथन सुरू होते. उमेदवार ठरविण्यासाठी डॉ. काब्दे  यांच्या हॉस्पिटलमध्येच बैठक सुरू होती. तेव्हा अखेर सर्वच नेत्यांना काब्दे  यांना गळ घातली व ते निवडणुकीला तयार झाले. काब्दे  यांनी दिलेल्या माहितीनुसार कसेबसे सहा लाख रूपये जमले, त्यातच निवडणूक खर्च भागविला. 1400 गावे मतदारसंघात होती, त्यापैकी 140 गावांत पोहचलो. राजीव गांधी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे कुलूप उघडण्यास दिलेल्या परवानगीमुळे नाराज मुस्लिम मतदार, लोकसभा पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांनी अ‍ॅड. आंबेडकर यांचा केलेल्या पराभवाचा दलित मतदारांना आलेला राग, डॉ. काब्दे यांची जनमाणसांती स्वच्छ प्रतिमा, माजी मंत्री रजनीताई सातव यांनी कोमटी समाजाबद्दल काढलेल्या अनुद‍्गारामुळे नांदेडात प्रभावी असणार्‍या कोमटी मतदारांचा रोष डॉ.  काब्दे यांच्या विजयास पूरक ठरला, असे निरीक्षण कुळकर्णी यांनी नोंदविले. चंद्रशेखर पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदाची ऑफर आली होती, ती त्यांनी प्रामाणिकपणे नाकारली.
Lok Sabha Election 2024 | अशोकरावांनीच नाव सुचविले?
या निवडणुकीसाठी माजी आमदार गंगाधर पटने यांचेही नावे चर्चेत होते. परंतु डॉ.  काब्दे यांच्या नावाचा त्यांनी आग्रह धरला. एका स्मरणिकेत डॉ.  काब्दे यांचे नाव अशोक चव्हाण यांनीच आपणास सुचविले, जेणेकरून निवडणूक त्यांना सोपी जाईल, असे त्यांना वाटत होते, अशी माहिती पटने यांनी नमूद केली आहे. पण ही आयडीया चव्हाणांच्या अंगलट आली. नांदेडमधील दलित, मुस्लिम मतदारांचा अंदाज त्यांना आला नाही, ते पराभूत झाले.  काब्दे विजयी झाल्यानंतर शरद पवार नांदेडात आले होते, पटने यांना पाहताच ते म्हणाले, गंगाधर तू हा काय चमत्कार केलास?.  मराठवाड्यातील पहिले हृदयरोग तज्ञ असणारे  काब्दे यांनी  सर्वप्रथम महाराष्ट्रात इको मशिन आणली, असा त्यांचा दावा आहे. या मशिनचा उपयोग करण्यासाठी मुंबई,पुणे येथील तज्ञ 1976 ला नांदेडला येत असत, अशी आठवण त्यांनी सांगितली.  ऐंशी ओलांडली तरी  काब्दे हे अजूनही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात ते काम करताता. मराठवाडा जनता विकास परिषेदेच्या माध्यमातून अनेक प्रश्‍नांचा ते पाठपुरावा करतात.
विधानसभेत उडी मारणारे नेते
बीडमधून विजयी झालेले जनता दलाचे नेते बबनराव ढाकणे यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्री, दोन्ही सभागृहाचे उपसभापती, विरोधी पक्षनेते अशी पदे भूषविली होती. ढाकणे यांचा युवावस्थेतील काळ गाजला तो विधानसभा सभागृहात मारलेल्या उडीमुळे. 8 जुलै 1968 रोजी पावसाळी अधिवेशन सुरू असताना त्यांनी पाथर्डीतील विविध प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रेक्षक गॅलरीतून पत्रके फेकली तसेच सभागृहात थेट उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. नियमांचा भंग केल्या बद्दल ढाकणे  सात दिवस  ऑर्थर तुरुंगात होते. ऊसतोडणी मजुरांचे नेते असणार्‍या ढाकणे यांनी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना कामगारांना मान्य होईल, असा करार केला होता. 1989च्या निवडणुकीत त्यांना बीडमधून जनता दलाने उभे केले होते. ढाकणे यांना 2,29,496 तर केशरकाकूंना 2,27,511मते मिळाली. भाजपने उभे केलेल्या सदाशिव मुंडे यांना एक लाख 33 हजार मते पडली होती. 1985 मतांनी बबनराव लोकसभेत विजयी झाले. चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात त्यांना उर्जा खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. वंजारी समाजाचे ते केंद्रातील पहिले मंत्री ठरले. हे दोन्ही नेते नंतर संसद सदस्य होवू शकले नाहीत, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
हेही वाचा 

बिहारमधील राजकारणावर प्रशांत किशोर यांचे मोठे भाकीत; ‘भाजपसह मित्र पक्ष आगामी काळात…’
Lok Sabha Election 2024 : मतदान करताना भारतीय महिला नवऱ्याचा ‘आदेश’ मानतात का? निवडणुकांचा अभ्यास काय सांगतो?
Lok Sabha Election 2024 | उत्तरेतील दिग्गजांना शह देत दाक्षिणात्य पी. व्ही. नरसिंह राव कसे बनले होते पंतप्रधान?
Lok Sabha Election 2024 : वेध लोकसभेचे; लोकसभा निवडणुकांत अनुभवले चढउतार   
Lok Sabha Election 2024 | वेध लोकसभेचे; निझामाविरोधात लढणार्‍या स्वातंत्र्यसेनानींना संधी

Latest Marathi News वेध लोकसभेचे; डॉ. व्यंकटेश काब्दे, ढाकणे यांचे अनपेक्षित विजय Brought to You By : Bharat Live News Media.