पुणे : टंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय : व्हॉल्व, स्प्रिंकलर नादुरुस्त झाल्याने गळती
वारजे : Bharat Live News Media वृत्तसेवा : खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे सध्या झपाट्याने घट होत आहे. यामुळे शहरासह उपनगरांतील नागरिकांना आगामी काळात पाणीटंचाईला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मात्र, वारजे परिसरातील गणेशपुरी येथे जलवाहिनीचा व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने शनिवारी (दि. 30) पाण्याचा अपव्यय झाला. तसेच सेवा रस्त्याच्या लॉनवरील स्प्रिंकलरमधूनही पाण्याची गळती होत आहे.
परिसरातील गणेशपुरी येथे मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्ववरून अवजड वाहन गेल्याने त्याचा बोल्ट निघाल्याने पाण्याचे उंच फवारे उडत असल्याचे चित्र पाहवयास मिळाले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने या व्हॉल्वची तातडीने दुरुस्ती केली. वारजे-महामार्ग सेवा रस्त्यालगत वारजेतील स्व. रमेश वांजळे हायवे चौक ते डुक्करखिंडपर्यंत दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावर प्रशासनाने हिरवळीचे लॉन तयार केले आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने लॉन सुकू नये यासाठी त्यावर सकाळी व सायंकाळी स्प्रिंकलरमधून पाणी मारले जात आहे. मात्र, काही स्प्रिंकलर नादुरुस्त झाल्याने त्यातून पाणी गळती होत असल्याने शेकडो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असल्याचेही चित्र दिसून आले. या पाण्यामुळे रस्ते निसरडा झाल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होत असल्याने या स्प्रिंकलररची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सेवा रस्त्याच्या लॉनवरील अनेक स्प्रिंकलर नादुरुस्त झाल्याने त्यातून गळती होत असल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय होत आहे. स्प्रींकलरचे पाणी लॉनवर न पडता रस्त्यावर पडत असल्याने रस्ता निसरडा झाल्याने दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. यामुळे या स्प्रिंकलरची प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी.
-नीलेश आगळे, सामाजिक कार्येकर्ते.
हेही वाचा
कामगारांचे पगार थकले, गडहिंग्लजकर पाण्याला मुकले
राज्यातील आरोग्य विभागात ६५०० कोटींचा घोटाळा; रोहित पवारांचा आरोप
शेतकर्यांना दिलासा ! जिल्हा बँकेच्या पीककर्ज मर्यादेत पाच टक्के वाढ
Latest Marathi News पुणे : टंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय : व्हॉल्व, स्प्रिंकलर नादुरुस्त झाल्याने गळती Brought to You By : Bharat Live News Media.