काँग्रेसने कच्चाथिवू बेट श्रीलंकेला देऊन भारतासमोर संकट उभे केले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : काँग्रेसने श्रीलंकेला कच्चाथिवू बेट कायमचे देऊन टाकले आणि भारतासमोर एक मोठे संकट उभे केले. काँग्रेसने 70 वर्षे भारताचे ऐक्य आणि अखंडतेसमोर केवळ आव्हाने उभे करण्याचे काम केले, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. प्रत्येक भारतीयाच्या मनात त्याबद्दल राग साचलेला आहे. काँग्रेसवर कसा विश्वास ठेवणार, असा सवालही पंतप्रधानांनी केला.
कच्चाथिवूसंदर्भात माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या अहवालाचा हवालाही पंतप्रधानांनी दिला आणि सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. इंदिरा गांधींच्या सरकारने 1974 मध्ये हे बेट श्रीलंकेला भेट म्हणून दिले होते, असे अहवालात नमूद आहे.
तामिळनाडू भाजपचे प्रमुख अण्णामलाई यांनी याबाबत आरटीआय दाखल केले होते. यापूर्वी 10 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान मोदींनी संसदेच्या सभागृहातही कच्चाथिवूबाबत वक्तव्य केले होते. तामिळनाडूचे राज्य सरकार मला पत्र लिहून कच्चाथिवू बेट परत मिळविण्याची विनंती करतात. हे बेट भारतमातेचे अविभाज्य अंग नव्हते काय? इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारने तेही भारतापासून वेगळे कोणत्या आधारावर केले, असे तेव्हा मोदी म्हणाले होते. दुसरीकडे तामिळनाडूतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने हा मुद्दा उकरून काढल्याचा प्रत्यारोप काँग्रेसने केला आहे.
आरटीआय अहवालातील तीन मुद्दे
1) 1974 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षा सिरिमाओ बंदरनायके यांच्यात एक करार झाला. त्याअंतर्गत कच्चाथिवू बेट औपचारिकपणे श्रीलंकेकडे सुपूर्द करण्यात आले.
2) 1974 मध्ये भारत-श्रीलंका अशा दोन बैठका झाल्या होत्या. पहिली बैठक 26 जून रोजी कोलंबोमध्ये आणि दुसरी बैठक 28 जून रोजी दिल्लीत झाली. त्यात हे बेट श्रीलंकेला देण्याचे ठरले.
3) भारतीय मच्छीमार या बेटावर जाळे वाळविण्यासाठी जाऊ शकतील. बेटावरील चर्चमध्ये भारतीयांना व्हिसामुक्त प्रवेश असेल, या अटीही करारांतर्गत होत्या.
कुठे आहे कच्चाथिवू बेट?
– तामिळनाडू आणि श्रीलंकेदरम्यानच्या सागरी क्षेत्राला पाल्क स्ट्रेट म्हणतात. येथे अनेक बेटे आहेत. त्यापैकी कच्चाथिवू हे एक आहे.
– रामेश्वरमपासून 19 कि.मी. अंतरावर 285 एकरचे हे बेट आहे. कचथीवू पसरले आहे. ते बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राला परस्परांशी जोडते.
– श्रीलंका आणि चीनदरम्यानच्या अनेकविध करारांमुळे श्रीलंकेतील भूमी चीनला खुली झाली आहे. सामरिकद़ृष्ट्या हे बेट भारतासाठी आज महत्त्वाचे ठरले असते.
Latest Marathi News काँग्रेसने कच्चाथिवू बेट श्रीलंकेला देऊन भारतासमोर संकट उभे केले; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप Brought to You By : Bharat Live News Media.