हाताच्या पंजात पहिल्यांदाच बाण घुसला

हाताच्या पंजात पहिल्यांदाच बाण घुसला

सातारा : काँग्रेसचा बालेकिल्ला बनलेल्या सातारा जिल्ह्यातील राजकारणात खर्‍या अर्थाने बदलाची चाहूल लागली ती 1991च्या लोकसभा निवडणुकीत. एकतर्फी मैदान मारण्याची सवय लागलेल्या काँग्रेसला या निवडणुकीने यश दिले खरे मात्र त्यांच्यासाठी धोक्याची घंटाही वाजली. काँग्रेसचा कमालीचा प्रभाव असणार्‍या या जिल्ह्यात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिल्याच प्रयत्नात  व्होट बँक तयार झाली ती याच निवडणुकीत. काँग्रेसच्या प्रतापराव भोसले यांनी विजयाची हॅट्रट्रिक साधली तरी शिवसेनेच्या धनुष्यबाणाने पहिल्यांदाच मतदारांपुढे जात तब्बल लाखाच्या वर मते मिळवत मारलेली आश्चर्यकारक मुसंडी सर्वांच्याच भुवया उंचावणारी होती. हाताच्या पंजात पहिल्यांदाच बाण घुसण्याची ही निवडणूक होती. कराड मतदार संघातून प्रेमलाताई चव्हाण यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवत संसदेत प्रवेश केला.

 1991ची लोकसभा निवडणूक काँग्रेसला भविष्यातील संकटाची चाहूल करून देणारी ठरली. सातारा लोकसभा मतदारसंघाने सातत्याने काँग्रेसची पाठराखण केली होती. 1989 मध्ये या जिल्ह्यात जनता दल, जनता पक्ष आणि भाजपा यांनीही मतदारांचा कौल घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नव्हते. 1991 मध्ये सातारा मतदारसंघातून शिवसेनाही या आखाड्यात उतरली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने  शिवसेनेला आस्मान दाखवले खरे पण त्यांनी घेतलेली मते दुर्लक्षित करता येणारी नव्हती. भविष्यातील विरोधकांंच्या यशाची ही जणू नांदीच ठरली होती. जनता दल, जनता पार्टी या पक्षांना अत्यंत नगण्य मते पडली.

प्रतापराव भोसले 1 लाख 59 हजार 129 मतांनी विजयी झाले. त्यांना 2 लाख 61 हजार 129 तर शिवसेनेच्या हिंदूराव नाईक निंबाळकर यांना 1 लाख 1 हजार 917 मते मिळाली.  जनता दलाचे डी. डी. रणवरे यांना 12 हजार 675, जनता पार्टीचे के. बी. जमदाडे यांना 5 हजार 248, भारतीय कृषि उद्योग संघाचे अ‍ॅड. लक्ष्मण जाधव यांना 4 हजार 219, दूरदर्शी पार्टीचे पांडुरंग पतंगे यांना 709, अपक्ष अ‍ॅड. दस्तगीर भाई मेटकरी यांना 1 हजार 856, अपक्ष कोंडिराम शेलार यांना 1 हजार 218, अपक्ष शिवाजी घाडगे यांना 970 तर दत्तात्रय बर्गे यांना 602 मते मिळाली होती.

काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात शिवसेनेने खर्‍या अर्थाने मारलेली मुसंडी राजकीय अभ्यासकांना विचार करायला लावणारी ठरली. निंबाळकर यांनी प्रचारकाळात काँग्रेसवर टीकेची चौफेर झोड उठवली होती. जातीयवादाचा शिक्का बसलेल्या शिवसेनेने विकासाच्या मुद्यावर जोर देवून सर्वसामान्य मतदाराला आपलेसे करण्यात यश मिळवले. त्यामुळे निवडणुकीत जरी अपयश पदरी पडले तरी स्वत:ची व्होटबँक तयार करण्यात शिवसेना यशस्वी ठरली होती. हीच या पक्षासाठी या निवडणुकीत जमेची बाजू ठरली. हाताच्या पंजावर मतदान करण्याची सवय असलेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच बाण काळजात घुसला होता.

कराड  मतदारसंघातही अपेक्षेप्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने बाजी मारली. चव्हाण घराण्याने या मतदारसंघातील आपला हक्क या निवडणुकीतही कायम ठेवला. प्रेमलाताई चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांचेच पुत्र पृथ्वीराज चव्हाण निवडून आले. नागनाथअण्णा नायकवडी यांनी उभे केलेले आव्हान काँग्रेसने दुसर्‍या वेळीही परतवून लावले. या निवडणुकीत काँग्रेसचे मतदान लाखाने घटले. तर भाजपाही र्‍हासाच्या दिशेने गेला.

पृथ्वीराज चव्हाण यांना 2 लाख 72 हजार 440 तर अपक्ष नागनाथअण्णा नायकवडी यांना 1 लाख 80 हजार 60 मते मिळाली. भाजपच्या राजाभाऊ देशपांडे यांना केवळ 30 हजार 987 मतांवर समाधान मानावे लागले. जनता पार्टीचे विश्वासराव पाटील यांना 7 हजार 476 तर दूरदर्शी पार्टीचे मुडशिंग चव्हाण यांना 2 हजार 177 तर अपक्ष पुंडलिक पाटील यांना 1 हजार 250, सूर्यकांत माळी यांना 782, कृष्णराव यादव यांना 737 तर संपतराव सावंत यांना 479 मते मिळाली.

(क्रमश:)

Latest Marathi News हाताच्या पंजात पहिल्यांदाच बाण घुसला Brought to You By : Bharat Live News Media.