स्वत:चा बचाव करा! हिट वेव्हने पोल्ट्री व्यवसायही होरपळला

स्वत:चा बचाव करा! हिट वेव्हने पोल्ट्री व्यवसायही होरपळला

नाशिक ( निफाड ) : Bharat Live News Media वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, चांदवड, येवला, मनमाड, मालेगाव, नांदगाव आणि निफाड तालुक्यातील काही दुष्काळसदृश समजल्या जाणाऱ्या किंवा कोरडे हवामान व अल्प पर्जन्यवृष्टी असणाऱ्या भागामध्ये कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी चांगला लाभ मिळवून देणारा जोडधंदा म्हणून प्रचलनात आहे. यंदा मात्र निसर्गाने लहरीपणाचा झटका देत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांना चांगलेच जेरीस आणले आहे. हिट वेव्हमुळे पोल्ट्री व्यवसाय होरपळला आहे.
गेल्या आठवड्यामध्ये वातावरणात अचानक मोठे फेरबदल बघायला मिळाले. महाशिवरात्रीपर्यंत जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवत होता. ऐन हिवाळ्यात पडावी तशी थंडी दोन आठवड्यांपूर्वी पडलेली होती. त्यानंतरही दुपारी कडक ऊन आणि रात्री कडाक्याची थंडी असं विचित्र हवामान नागरिकांना अनुभवायला मिळालं. पंधरा-वीस दिवसांपूर्वी राज्यातील सर्वात कमी तापमान ५ अंश सेल्सिअस नाशिक जिल्ह्यातील निफाड मध्ये नोंदविले गेले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये गेल्या आठवड्यात राज्यातील सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
वैशाख महिना पडावा असा उन्हाचा तडाखा म्हणजेच वैशाख वणवा यावर्षी होळीच्या फाल्गून महिन्यामध्येच अनुभवायला मिळू लागला आहे. गेल्या खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा देखील अवघड जाणार ही भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. संभाव्य संकटाची जणू काही झलकच दिसू लागली असताना उन्हाळा सुरू होतो न होतो तोच जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली असून अशरक्ष: भाजून काढणारे उन, उष्ण हवा, उन्हाच्या तीव्र झळा यामुळे अचानक आलेल्या उष्णतेच्या लाटेचा कुक्कुटपालन व्यवसायाला प्रचंड फटका बसू लागला आहे.
पोल्ट्री व्यवसायासाठी योग्य तापमान हा खूप मोठा घटक समजला जातो. कोंबडीची पिल्ले ही अत्यंत नाजूक असल्याने त्यांना तापमानात झालेला बदल सहन होत नाही. साधारणपणे २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान हे कोंबडी पिलांसाठी योग्य असते. या मर्यादेतील तापमानामध्ये त्यांचे चांगल्या पद्धतीने पोषण होऊन काेंबड्यांची चांगली वाढ होऊ शकते. परंतु यापेक्षा जास्त तापमान झाल्यास पिलांच्या जीवाला धोका निर्माण होऊन ते मृत पावतात. गेल्या काही दिवसांपासून तापमापनाचा पारा हा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे सरकू लागला आहे.
सर्वसाधारणपणे कुक्कुटपालन व्यवसायामध्ये पक्षांच्या मृत्यूचे प्रमाण दोन ते तीन टक्के आढळून येते. आजच्या घडीला मात्र या तापत्या उन्हाळ्यामुळे पोल्ट्री फार्म मधील नाजूक पिल्लांचे मृत्यूचे प्रमाण आता दहापटीने वाढून २० टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. कोंबडी पिल्लांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणामुळे पोल्ट्री चालकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. मार्च महिना संपण्याच्या आतच ही परिस्थिती असेल तर यापुढचे अडीच महिने किती भयंकर परिस्थिती ओढवेल याची कल्पना करता येत नाही. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांपुढे मोठे संकट ठाकले असून कुक्कुटपालनाच्या व्यवसायावर टांगती तलवारीला कसे सामोरे जावे असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

नागपूर : मविआतच समझोता नाही; म्‍हणूनच वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत : ॲड. प्रकाश आंबेडकर
Lok Sabha Election 2024 : जनबल.. बुद्धिबल.. धनबल.. अहं केवळ बाहुबल!
ShahRukh Khan : अनन्या पांडे शाहरूख खानची लकी चार्म

Latest Marathi News स्वत:चा बचाव करा! हिट वेव्हने पोल्ट्री व्यवसायही होरपळला Brought to You By : Bharat Live News Media.