सहा ठिकाणी रहाडींमध्ये उधळला नाशिककरांनी रंगारंग
नाशिक : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क
सप्तरंगांची रंगाची उधळण केल्या जाणाऱ्या रंगपंचमीच्या उत्सवासाठी अवघे नाशिक सजले होते. रंगप्रेमींसाठी शहरात सहा ठिकाणी रहाडी उघडण्यात आल्याने राहड संस्कृती जोपासण्यासाठी व या रहाडींमध्ये ‘धप्पा’ मारण्या साठी शहरवासीयांनी हजेरी लावून मनमुरादपणे आनंद लुटला.
होळी पाैर्णिमेनंतर नाशिककरांना खऱ्याअर्थाने आतुरता लागून असते ती रंगपंचमीची. विविध रंगांची मनसोक्त उधळण करीत मनाला आनंद देणारा हा उत्सव शनिवारी (दि.३०) सर्वत्र साजरा करण्यात आला. या उत्सवाकरीता नाशिककरांनी जय्यत तयारी करत रहाड उत्सवही साजरा केला. लाल, पिवळा, नारंगी, निळा असे सप्तरंगात न्हाऊन निघण्यासाठी रंग रंगप्रेमींनी बाजारपेठेत गर्दी केली. याशिवाय बच्चे कंपनीने रंगोत्सवाचा आनंद लूटला.
नाशिकमध्ये रंगपंचमी आणि रहाड हे पेशवेकाळापासून समीकरण जूळलेले आहे. रंगपंचमीसाठी रहाडी ऊघडण्यात आल्या. गेल्यावर्षी पर्यंत शहरात पाच रहाडी असायचा. यंदा मधल्या होळीत नव्याने रहाड सापडली असल्याने रंग प्रेमींना धप्पा मारण्यासाठी सहा रहाडी उपलब्ध झाल्या होत्या. शनिवारी दुपारी १२ नंतर जलपूजन करुन सामान्य नाशिककरांसाठी या रहाडी खुल्या करुन देण्यात आल्या. दरम्यान, लाेकसभा निवडणूक पार्श्वभुमीवर पाेलीस विभागाकडून चोख बंदोबस्त तैनात होता. रहाडींच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस विभागाचे याठिकाणी विशेष असे लक्ष होते.
नैसर्गिक रंगांना मागणी
गेल्याकाही वर्षापासून रंगपंचमीला नैसर्गिक आणि हर्बल रंगाच्या वापराकडे नाशिककरांचा कल वाढल्याचे बघायला मिळाले. साधारणत: दोनशे रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यत त्यांचे दर ठरलेले आहेत. याशिवाय १०, २० तसेच ५० रुपयां पर्यंत तोळा आणि पुड्यांमध्ये रंगाची विक्री केली जात आहेत.
अशा आहेत रहाडी
-शनि चाैक, पंचवटी
-दिल्ली दरवाजा, गोदाघाट
-तिवंधा चौक, जुने नाशिक
-दंडे हनुमान चाैक, जुने नाशिक
-जुनी तांबट आळी, जुने नाशिक
-मधली होळी, बुधवार टेक, जुने नाशिक
रहाडीमध्ये ‘दे धप्पा’!
रंगपंचमीच्या दिवशी नाशकात रहाडीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्याची खूप जुनी परंपरा आहे. उडी मारण्याच्या एक पद्धतीला ‘धप्पा’ मारला, असे मजेदार नाव आहे. ‘धप्पा’ मारल्यावर किमान २० ते २५ माणसाच्या अंगावर रंगाचे पाणी उडाले तर तो खरा ‘धप्पा’ समजला जातो. ज्या माणसाच्या अंगावर रंग नाही त्याने या वर्षी रहाडीत ‘धप्पा’ मारला नाही असे समजले जाते. पूर्वी रहाडी म्हणजे तालमीच्या पहिलवानांची जागा होती. याठिकाणी वेगवेगळे गट येऊन शक्तिप्रर्दशन करीत असत. त्यातून नंतर मारामाऱ्या होऊ लागल्या आणि रहाडा झाला म्हणून ‘रहाडी’ असे नामकरण प्रचलित झाले, असे जुने जाणते लोक सांगतात.
Latest Marathi News सहा ठिकाणी रहाडींमध्ये उधळला नाशिककरांनी रंगारंग Brought to You By : Bharat Live News Media.