क्रिकेट : कर्णधारबदलाचे वारे

क्रिकेट : कर्णधारबदलाचे वारे

विवेक कुलकर्णी

आयपीएल स्पर्धेची तमाम क्रिकेट रसिकांना उत्सुकता लागून राहिलेली असते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. दरवर्षी या स्पर्धेत अनेकविध बदल होत असतात आणि यंदा तर अनेक समीकरणांची अक्षरश: उलथापालथ झाली आहे. यावेळी एक-दोन नव्हे, तर चक्क सहा संघांनी आपापले कर्णधार बदलले आहेत. त्यामुळेच प्रश्न निर्माण होतो की या बदलांचा नेमका अर्थ काय?
यंदाची आयपीएल भविष्याचा वेध घेणारी असेल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, इतके व्यापक फेरबदल यंदाच्या मोसमापूर्वीच घडले. मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांनी आपापले कर्णधारच बदलून टाकले. यात काही संघांची अपरिहार्यता होती तर काही संघांचा नाईलाज. पण, प्रवाहाखालून बरेच पाणी वाहून जात असताना बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे, हाच याचा खरा मथितार्थ.
सर्वात प्रारंभी बदल आहे तो चेन्नई सुपरकिंग्जचा. माहीसारखा निष्णात क्रिकेटिंग ब्रेन बाजूला सारून ऋतुराज गायकवाडसारखा नवा कर्णधार नियुक्त करण्यासाठी वाघाचे काळीज असावे लागते. ते वाघाचे काळीज चेन्नईच्या थिंक टँकने, त्यांच्या व्यवस्थापनाने दाखवून दिले. पण, याउपरही हा निर्णय खरोखरच चेन्नईच्या संघाला मानवणार का, याचे उत्तर भविष्यात दडलेले असेल. चेन्नईच्या सामन्यावर नजर टाकली तर एक प्रकर्षाने लक्षात येईल की, आताही मैदानावरचे सारे बदल, सारी क्षेत्ररचना माहीच ठरवत असतो. पण, कर्णधार म्हणून समोर चेहरा आहे तो ताज्या दमाच्या ऋतुराजचा!
मागील हंगाम गुजरात टायटन्सकडून गाजवणारा हार्दिक पंड्या यंदा मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला आणि यामुळे गुजरातला नवा कर्णधार नियुक्त करणे भाग होते. त्यांनीही तरुण रक्ताला, सळसळत्या उत्साहाला पसंती दिली आणि नेतृत्व सोपवले ते हरहुन्नरी गिलकडे!
सनरायझर्स हैदराबाद हा या हंगामात कर्णधार बदलणारा आणखी एक संघ! यापूर्वी या संघाच्या नेतृत्वाची कवचकुंडले मार्करमकडे होती. पण, या मोसमासाठी लिलावात या संघाने पॅट कमिन्सला करारबद्ध केले आणि तेथेच आणखी एका बदलाचे स्पष्ट संकेत मिळाले होते. झालेही तसेच. त्या तुलनेत दिल्लीची गोष्टच वेगळी. 2022 च्या उत्तरार्धात जीवघेण्या अपघातातून बचावलेला ऋषभ पंत मजल-दरमजल प्रवास करत मॅच फिटनेस मिळवण्यात यशस्वी ठरला अन व्यवस्थापनानेही त्याच्याकडेच नेतृत्व कायम राखत जणू त्याच्या धाडसालाच सलाम केला!
मागील पर्वात पंतच्या गैरहजेरीत नेतृत्वाची धुरा डेव्हिड वॉर्नरकडे सोपवली गेली होती. पण, त्यावेळी संघाची जी ससेहोलपट झाली, ती पाहता या संघाच्या नेतृत्व बदलावर शिक्कामोर्तब होणे स्वाभाविकच होते!
कर्णधार बदलांच्या या मांदियाळीत आणखी एक संघ म्हणजे केकेआर. मागील हंगामात श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्यामुळे खेळू शकला नव्हता. त्यावेळी नेतृत्वाची धुरा राणाकडे सोपवली गेली होती. यंदा श्रेयस तंदुरुस्त होऊन मैदानावर परत आला आणि साहजिकच आणखी एका संघाचा कर्णधार बदलला गेला!
या सर्वात मुंबई इंडियन्सची बातच न्यारी! कानामागून यावे आणि तिखट व्हावे म्हणजे नेमके काय, याचे प्रत्यंतर या संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या एका अनाकलनीय निर्णयाने दिले! या निर्णयाचे जे संतप्त पडसाद उमटले, त्याला सीमा नाही. यापुढेही असणार नाही!
मुळात रोहित शर्माला बाजूला करून आणखी कोणाकडे नेतृत्वाची कवचकुंडले इतक्या सहजतेने सोपवावीत, हे कोणालाच रुचलेले नव्हते. पण, ज्या पंड्याकडे इतक्या विश्वासाने ही धुरा सोपवली, त्या पंड्याने आपल्या घमेंडखोर वर्तणुकीत रोहितचा जो अवमान केला, त्याचे शल्य मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना सातत्याने बोचत राहणारे आहे!
आता रोहितला बाजूला करत हार्दिक पंड्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली गेली, त्याची प्रामुख्याने तीन कारणे प्रथमदर्शनी दिसून येतात. यातील पहिले कारण म्हणजे हार्दिकला संघात घेताना झालेले ट्रेड डील! मुळात गुजरात टायटन्सकडून अन्य कोणत्याही संघाच्या ताफ्यात दाखल होताना हार्दिकलाही नेतृत्वच अपेक्षित होते आणि त्याने ही अट घातली नसती तरच नवल!
यानंतर या निर्णयामागील दुसरा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे दस्तुरखुद्द रोहित शर्माचा फलंदाजीतील फॉर्म! मागील काही वर्षांत सर्व क्रिकेट प्रकारात रोहित शर्मा जागतिक स्तरावरील काही सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक राहिला असला तरी टी-20 क्रिकेट प्रकारात आणि त्यातही आयपीएलमध्ये याची म्हणावी तशी प्रचिती आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.
2023 मध्ये 16 सामन्यांत 20.75 च्या सरासरीने 332 धावा, 2022 मध्ये 14 सामन्यांत 19.14 च्या सरासरीने 268 धावा आणि 2021 मध्ये 13 सामन्यांत 29.30 च्या सरासरीने 381 धावा त्याच्या लौकिकाला अजिबात साजेशा नाहीत, हे ओघोनच आले!
आश्चर्य वाटेल; पण जागतिक स्तरावरील अव्वल ठरणार्‍या या फलंदाजाला आयपीएलमध्ये 30 पेक्षा अधिकची सरासरी 2016 नंतर एकदाही नोंदवता आलेली नाही, यात बरेच काही आले. 2015 नंतर एकाही मोसमात त्याचा स्ट्राईक रेट 140 चा आकडा पार करु शकलेला नाही, ही आणखी एक डोळ्यात अंजन घालणारी वस्तुस्थिती!
आता मुंबई इंडियन्ससाठी एक संघ या नात्याने मिळवलेले धवल यश व रोहितची नेतृत्वातील चुणूक या दोन बाजूंमुळे त्याचे फलंदाजीतील अपयश बाजूला ठेवले गेले असेलही. पण, मागील तीन वर्षांत जेतेपदाने सातत्याने दिलेली हुलकावणी संघ व्यवस्थापनाच्या जिव्हारी लागली आणि त्यानंतर कर्णधार बदलाची रीतसर प्रक्रिया सुरू झाली! सरतेशेवटी रोहितसारखा अव्वल दर्जाचा सलामीवीर सातत्याने फलंदाजीत अपयशी ठरतो आहे, हे दुर्लक्षून मुंबईला कधीच चालणार नाही. आता रोहित कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाला असल्याने तो आपल्या फलंदाजीला न्याय देऊ शकेल आणि संघही या हंगामात पुन्हा एकदा जेतेपदावर स्वार होईल, इतकीच त्यांची सरळ अपेक्षा असेल!
राहता राहते या निर्णयामागील तिसरे कारण. ते म्हणजे निव्वळ परिवर्तन. भाकरी करपायची नसेल तर ती वेळीच परतावी लागते आणि मुंबई इंडियन्सने यासाठी या हंगामातील वेळ अचूक साधण्याचा मनस्वी प्रयत्न करताना नेतृत्वाची भाकरीच एक प्रकारे परतवली आहे.
रोहित आता 36 वर्षांचा आहे. त्यामुळे वयपरत्वे चपळता मंदावत असेल आणि बॉडी रिफ्लेक्शनवर त्याचा विपरीत परिणाम होत असेल तर तो साहजिकच. मुळात रोहित शर्मा आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात आहे, हे तोही मान्य करेल. त्यामुळे मुंबई संघाला रोहितच्या पुढे काय, याचा विचार केव्हा तरी करावाच लागणार होता. तो त्यांनी यंदा केला आहे, इतकेच त्याचे इप्सित.
अर्थात, आयपीएल ही क्लबस्तरीय स्पर्धा. जागतिक स्तरावर खेळताना पुन्हा या खेळाची सारी परिमाणे बदलून जातात. तिथे खेळताना वेगळी मानसिकता अंगीकारावी लागते. आयपीएलचे दोन महिन्यांचे वैर आयपीएलमध्येच ठेवून द्यावे लागते. त्यामुळे या अर्धा डझनभर नव्या आणि जुन्या जाणत्या उर्वरित चार कर्णधारांनाही एक लाखमोलाचा कानमंत्र विसरून चालणार नाही. तो म्हणजे, दुश्मनी जम कर करो, लेकिन यह गुंजाईश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा ना हो!
Latest Marathi News क्रिकेट : कर्णधारबदलाचे वारे Brought to You By : Bharat Live News Media.