महिला : राजकारणाच्या पडद्यावर…
सोनम परब, सिनेअभ्यासक
बॉलीवूड आणि राजकारण यात काही प्रमाणात साम्य आहे. दोन्ही ठिकाणी भूमिका चोख बजावली तर लोक तुम्हाला हिरो म्हणून स्वीकारतात. चित्रपटात अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकता येतात; तर राजकारणामध्ये लोककल्याणाला प्राधान्य देत जनतेचे प्रश्न सोडवावे लागतात. दोन्हीही ठिकाणी परफॉर्मन्स किंवा कामगिरी हाच यशाचा मूलमंत्र आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री कंगना राणावतसह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविषयी…
बॉलीवूड आणि राजकारण यांचे नाते खूप वर्षांपासून चालत आलेले आहे. चित्रपटांमधील अभिनयाच्या माध्यमातून मिळालेल्या स्टारडमचा फायदा घेण्यासाठी सिनेकलावंतांना राजकारणात आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष उत्सुक असतात. यामध्ये खास करून अभिनेत्रींना झुकते माप दिले जाते. काही अभिनेत्रींनी निवडणुकांच्या माध्यमातून सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केल्याचीही उदाहरणे पाहायला मिळतात. बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला भारतीय जनता पक्षातर्फे हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कंगनाचा आजवरचा प्रवास रंजक आणि संघर्षमय राहिला आहे. कंगना सधन घरात जन्मली. घरात राजकीय पार्श्वभूमीही होती. पण लहानपणापासूनच अभिनय, कलेची आवड असल्यानं तिनं घर सोडण्याचा निर्णय घेतला होता.
कंगनाचा जन्म हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात झाला आणि आता याच मतदारसंघात तिला तिकीटही देण्यात आले आहे. कंगनाची आई शाळेत शिक्षिका होती. पण तरीही कंगनाला लहानपणापासून अभ्यासाची फारशी आवड नव्हती. बारावीत ती नापास झाली होती. त्यानंतर हिरोईन व्हायचं म्हणून घर सोडून ती मुंबईत आली. मंडी ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असे करत कंगना सिनेइंडस्ट्रीत आली आणि आघाडीची नायिका बनली. आतापर्यंत पाच वेळा तिने राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. कंगना अनेकदा वादातही अडकली आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर तिनं बॉलीवूडमधल्या बड्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला होता. तर मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरे विरुद्ध कंगना असाही वाद रंगला होता.
मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केल्यानंतर कंगनाने ‘उद्धव ठाकरे, आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा’, असे म्हणत एकेरी शब्दांत त्यांचा उल्लेख केला होता. ‘भारताला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं’, असे वक्तव्यही मध्यंतरी कंगनाने केले होते. त्यानंतर तिनं राजकीय मुद्द्यावर बोलायला सुरुवात केली. भाजपच्या समर्थनार्थ ती अनेकदा बोलताना दिसली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अनेकदा तिनं भेटीही घेतल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कंगना लोकसभेच्या रिंगणात दिसू शकते, अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. अखेर त्या खर्या ठरल्या. तसं पाहायला गेल्यास कंगना आणि तिच्या कुटुंबासाठी राजकारण नवीन नाहीये. कंगनाचे आजोबा सरजू राम मंडी जिल्ह्याच्या गोपाळपूर मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. आता कंगना भाजपकडून लोकसभेत प्रवेश करते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत बॉलीवूडची ड्रीमगर्ल म्हणजेच हेमा मालिनी यांनाही उत्तर प्रदेशातील मथुरा येथून पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उमेदवारी देण्यात आली आहे. या लोकसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्येही हेमामालिनी यांनी दणदणीत विजय मिळवला होता. यंदा त्या खासदारकीची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्या 2003 ते 2009 या काळात राज्यसभेच्या खासदारसुद्धा होत्या. 1999 मध्ये हेमा मालिनी यांनी पहिल्यांदा पंजाबमधील गुरदासपूर येथे लोकसभा निवडणुकीसाठी विनोद खन्ना यांचा प्रचार केला होता.
हेमा मालिनी यांच्याप्रमाणेच बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनी 2009 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या चंदीगडमधून 2014 मध्ये लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. 2019 मध्ये याच जागेवर पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी शानदार विजय मिळवला.
सिनेअभिनेत्रींप्रमाणेच छोट्या पडद्यावरील मालिका विश्वात आपला स्वतंत्र ठसा उमटवणार्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक स्मृती इराणी यांनीही राजकारणामध्ये प्रवेश करून समकालीन आणि इतिहासातील सर्वच अभिनेत्रींपेक्षा सरस कामगिरी करून दाखवली. वास्तविक त्यांना पूर्वीच्या काळी बराच संघर्ष करावा लागला. 2000 साली एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू भी’ या मालिकेत त्यांना ब्रेक मिळाला आणि त्यांचं नशीब उजळलं. या मालिकेत तुलसी हे पात्र साकारून त्या घराघरात पोहोचल्या. मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर 2003 साली त्यांनी भाजपत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच त्यांना भाजपच्या महिला विंगचं उपाध्यक्षपद देण्यात आलं. 2010 साली त्या भाजप महिला विंगच्या अध्यक्ष आणि पक्षाच्या राष्ट्रीय सचिव बनल्या. 2014 साली लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट मिळालं. अमेठीमधून काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात त्या उभ्या राहिल्या होत्या. परंतु या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. त्यानंतर 2019च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा तिकीट मिळालं. या निवडणुकीत त्यांनी दणदणीत मते मिळवत राहुल यांना पराभूत करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी महिला आणि बाल विकास मंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री म्हणून काम करण्यासह भारत सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
सत्तर-ऐंशीच्या दशकातील चित्रपटांमध्ये आघाडीची नायिका राहिलेल्या जयाप्रदा यांनीही राजकारणामध्ये दीर्घकाळ व्यतीत केला आहे. हिंदी आणि तेलुगू सिनेमातल्या सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून जयाप्रदा यांची ओळख आहे. रूपेरी पडद्यावरून राजकारणात आल्यानंतर सगळ्यात आधी त्या तेलुगू देसम पार्टीमधून (टीडीपी) राज्यसभेवर गेल्या. त्यानंतर समाजवादी पक्षात प्रवेश करून त्या रामपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मार्च 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रीय लोकदलाची साथ सोडली आणि त्या भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या.
बंगाली सिनेमातल्या ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चटर्जी यांनी जानेवारी 2019मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मिळालेल्या तिकिटावर निवडणूक लढल्या होत्या; मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नायिकाही राजकारणाच्या मोहिनीपासून लांब राहू शकल्या नाहती. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिलेल्या जयललिता राजकारणात येण्याअगोदर अभिनेत्री होत्या. अभिनेत्री नर्गिस, जया बच्चन, शबाना आझमी यांनी राज्यसभेत खासदार म्हणून काम केले आहे. तेलुगू सिनेमातील एक ज्येष्ठ अभिनेत्री जयासुधा यांनी 3 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या काँग्रेस आणि तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि नंतर वायएसआरसीपीमध्ये काही काळ राहून नंतर त्या भाजपमध्ये आल्या आहेत. तमिळ सिनेमातल्या दिग्गज अभिनेत्रींमधलं एक नाव म्हणजे खुशबू सुंदर. त्यांनी 2010 मध्ये डीएमके पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर 2014 मध्ये त्या काँग्रेस पक्षात गेल्या होत्या. पुढे 2020 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य आहेत. बॉलीवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरने जानेवारी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपने तिची महिला वाहतूक शाखेची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती. हिंदी अभिनेत्री माही गिलने 2022 मध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंजाबमधल्या मुलींसाठी भाजपबरोबर एकत्र राहून काही काम करण्याची इच्छा असल्याचं त्यावेळी या अभिनेत्रीनं सांगितलं होतं.
हरियाणवी नृत्यांगना, गायिका आणि अभिनेत्री अशी ओळख असलेल्या सपना चौधरीने जुलै 2019मध्ये भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं. बंगाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनय कारकिर्दीसाठी ओळखल्या जाणार्या मूनमून सेन यांनीही ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि संसद सदस्या म्हणून काम केले. कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रम्यानेही काँग्रेसमध्ये प्रवेश करत सक्रिय राजकारणात उडी घेतली आणि खासदार म्हणून काम केले.
बॉलीवूडमधील यशस्वी नायिका राहिलेल्या मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरनेही राजकारणात नशीब आजमावून पाहिले. पण ती स्वत:ची खास छाप पाडू शकली नाही. उर्मिला मातोंडकरने 2019 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि गोपाळ शेट्टींविरोधात मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. पण उर्मिला मातोंडकरची जादू चालली नाही आणि तिचा पराभव झाला. गुल पनागने तिच्या आयुष्यात खूप यश मिळवले आहे. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत चंदीगडमधून आम आदमी पक्षातर्फे तिने निवडणूक लढवली; मात्र तिला पराभवाला सामोरे जावे लागले.
बॉलीवूड आणि राजकारण यात काही प्रमाणात साम्य आहे, असे म्हणता येईल. या दोन्ही ठिकाणी तुम्ही तुमची भूमिका चोख बजावली तर लोक तुम्हाला हिरो म्हणून स्वीकारतात. सिनेसृष्टीमध्ये अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकता येतात; तर राजकारणामध्ये लोककल्याणाला प्राधान्य देत जनतेचे प्रश्न सोडवावे लागतात. दोन्हीही ठिकाणी परफॉर्मन्स किंवा कामगिरी हाच यशाचा मूलमंत्र आहे. स्टारडमच्या जीवावर एखाद-दुसरी निवडणूक जिंकता येऊ शकते; पण दीर्घकाळ राजकारणात राहण्यासाठी जनसामान्यांच्या समस्यांची सोडवणूक करणे अटळ आहे.
Latest Marathi News महिला : राजकारणाच्या पडद्यावर… Brought to You By : Bharat Live News Media.