शिरूरच्या दूध उत्पादकांवर जनावरे विकण्याची वेळ..
मांडवगण फराटा : Bharat Live News Media वृत्तसेवा : दुधाला योग्य बाजारभाव मिळत नाही. शासनाचे अनुदानही अद्याप मिळालेले नाही. त्यात दुष्काळी परिस्थितीमुळे चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शिरूरच्या पूर्व भागातील दूध उत्पादक शेतकरी दुहरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे दुभती जनावरे विकण्याची वेळ या दूध उत्पादक शेतकर्यांवर आली आहे. शिरूरच्या पूर्व भागातील अनेक तरुण शेतीबरोबरच दूध उत्पादनाचा व्यवसाय करत आहेत. गेल्या वर्षापासून दुधाला चांगला दर मिळू लागल्याने या व्यवसायाकडे तरुण शेतकर्यांचा ओढा वाढला. या व्यवसायातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले होते. शेतमालापेक्षा दूधधंदा अधिक भरवशाचा वाटू लागल्याने काहींनी अत्याधुनिक गोठे बांधले.
अनेकांच्या गोठ्यात नव्याने गायी, म्हशी दिसू लागल्या. परंतु, काही दिवसांपासून दुधाच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी चांगलाच हैराण झाला आहे. त्यातच जनावरांच्या खाद्याचे दरही कमालीचे वाढले आहेत. त्यामुळे दूध दराची खर्चासोबत सांगड घालणे अवघड होऊ लागले आहे. आता तर चार्याचा तुटवडा, पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
दुधाचे अनुदानही मिळेना
दूध व्यवसायासाठी गायी खरेदी करण्याकरिता अनेकांनी कर्ज घेतले. मात्र, आता घरखर्चही या दूध व्यवसायातून चालत नसेल, तर हा व्यवसाय बंद केलेलाच बरा, अशी प्रतिक्रिया दूध उत्पादक शेतकरी देऊ लागले आहेत. तसेच, अनेक शेतकर्यांचे दुधाचे अनुदान जमा झाले नसल्यामुळे शेतकरी संभ्रमात पडला आहे. नक्की अनुदान जमा तरी होणार कधी? असाही प्रश्न विचारला जात आहे.
शासनाच्या किचकट अटी व नियमांमुळे अनेक दूध उत्पादक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. तसेच, या परिसरात अनेक दूध व्यावसायिक शेतकरी दोन वेगवेगळ्या दूध संकलन केंद्रांवर दूध घालत असल्यामुळे देखील हे ते अनुदानापासून वंचित आहेत.
-संजय घाटगे, चेअरमन, श्री सिद्धेश्वर दूध संकलन केंद्र, इनामगाव.
हेही वाचा
दूधदरात घट; पशुखाद्याची मात्र दरवाढ सुरूच : दूध उत्पादक शेतकरी संकटात
Trainee Police: प्रशिक्षणार्थी पोलिसांची प्रकृती बिघडली
जेजुरीत चार दिवसांतून एकदा पाणी; महिलांचा ‘हंडा मोर्चा’चा इशारा
Latest Marathi News शिरूरच्या दूध उत्पादकांवर जनावरे विकण्याची वेळ.. Brought to You By : Bharat Live News Media.