जुन्नर नगरपरिषदे दणका! थकीत करांमुळे 30 हून अधिक मालमत्ता जप्त

जुन्नर नगरपरिषदे दणका! थकीत करांमुळे 30 हून अधिक मालमत्ता जप्त

जुन्नर : Bharat Live News Media वृत्तसेवा : कराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांविरोधात जुन्नर नगरपरिषदेने मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार थकीत कर असलेल्या 30 पेक्षा अधिक मालमत्ता जप्त करण्यात आल्या. थकबाकी असणार्‍यांची नावे असलेले फ्लेक्स शहरातील विविध भागात लावले आहेत. त्यामुळे दि. 28 व 29 या दोन दिवसांत 7 लाख 62 हजार 463 रुपयांची थकबाकी वसूल झाली असल्याची माहिती कर निरीक्षक दत्तात्रय सुतार यांनी दिली. नगरपरिषदेची सन 2023-24 या आर्थिक वर्षाची मालमत्ताकराची थकबाकी व चालू मागणी मिळून एकूण 4 कोटी 85 लाख 55 हजार रुपये इतकी आहे. या आर्थिक वर्षात दि. 28 मार्चअखेर थकबाकीची एकूण 75 लाख 36 हजार व चालू मागणीची एकूण 2 कोटी 85 लाख 56 हजार रुपये इतकी झाली आहे. त्यानुसार 62 टक्के वसुली झाली असून गतवर्षापेक्षा 6 टक्क्याने कमी वसुली झालेली आहे.
पाणीपट्टीची चालू मागणी व थकबाकी धरून 1 कोटी 88 लाख 53 हजार रुपये आहे. त्यामधील एकूण 58 लाख 92 हजार रुपयांची वसुली झाली आहे. पाणीपट्टी वसुलीची टक्केवारी ही 31.25 टक्के इतकीच असून ती 95 टक्के होणे अपेक्षित होते. थकबाकीदारांना यापूर्वीच नोटीस बजावलेल्या आहेत, तरीदेखील थकबाकी भरली जात नाही. त्यामुळे नगरपरिषदेने थकबाकीदारांच्या 30 पेक्षा अधिक मिळकती जप्त केल्या आहेत, तर 20 पेक्षा अधिक नळजोड देखील बंद केले आहेत. याशिवाय थकबाकीदारांचा सातबारा उतारा व मालमत्ता पत्रकावर बोजा चढविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
अधिकार्‍यांना फोनवरून विनवण्या
नगरपरिषदेने थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर प्रसिद्ध केली. फ्लेक्सवर नावे असल्याचे समजताच ती काढून टाकण्यासाठी काही जण नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांना फोनवरून विनवण्या करत आहेत. ’साहेब, थकबाकी भरतो; पण आमचे नाव टाकू नका,’ असे सांगत अनेक थकबाकीदार नगरपरिषदेत येत करभरणा करत आहेत.
एप्रिल 2024 पासून थकबाकीच्या रक्कमेवर शासन नियमानुसार शास्ती लावण्यात येणार आहे. दि. 31 मार्च अखेर मिळकत कर व पाणीपट्टी कराचा भरणा करावा; अन्यथा प्रशासनाकडून कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.
– संदीप भोळे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, जुन्नर नगरपरिषद

हेही वाचा

शिरूरच्या दूध उत्पादकांवर जनावरे विकण्याची वेळ..
Trainee Police: प्रशिक्षणार्थी पोलिसांची प्रकृती बिघडली
Crime News : मुंबईच्या चोरट्यांचा पुण्यात घरफोडीचा धंदा..

Latest Marathi News जुन्नर नगरपरिषदे दणका! थकीत करांमुळे 30 हून अधिक मालमत्ता जप्त Brought to You By : Bharat Live News Media.