अनुकूल हवामानामुळे हापूस मुबलक..
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यातील अनुकूल हवामानामुळे यंदा कोकणातील हापूस आंब्यांचे पीक चांगले अपेक्षित असून, 20 एप्रिलनंतर आवक वाढण्यास सुरुवात होईल. मे महिन्यात आवक दुप्पट वाढून दर आवाक्यात येण्याची अपेक्षा आहे. राज्य कृषी पणन मंडळाच्या आंबा महोत्सवाला 1 एप्रिलपासून मार्केट यार्डात सुरुवात होत असून, ’शेतकरी ते ग्राहक’ अशी थेट आंबा विक्री सुरू होईल. कोकणातील उच्च प्रतीच्या हापूस आंब्यासह राज्याच्या विविध भागांतील केशर आंब्याची खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होत आहे.
पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने मार्केट यार्डातील पीएमटी बस डेपोशेजारील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत आंबा महोत्सव होत आहे.
आंबा महोत्सवाचे उद्घाटन 1 एप्रिलला होऊन तो 31 मेपर्यंत चालू राहील, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली. कदम म्हणाले की, महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील तसेच राज्यातील केशर आंबा उत्पादकांचा सहभाग आहे. शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा, हा उद्देश आहे. महोत्सवासाठी 125 आंबा उत्पादकांनी नोंदणी केली असून, सुमारे 60 स्टॉलमधून 95 उत्पादक हापूस, केशर, पायरी, बिटकी (लहान आंबा) आंबा विक्री करतील. तसेच, 10 बचत गटांच्या स्टॉलमधून विविध प्रक्रियायुक्त उत्पादने खरेदीची संधीही ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दलालांऐवजी थेट ग्राहकांना हापूस विक्रीचे कौशल्य प्राप्त
पुण्यात होणार्या पणन मंडळाच्या आंबा महोत्सवात गेली सहा वर्षे आम्ही सहभागी होत असून, दलालांऐवजी थेट ग्राहकांना हापूस आंबा विक्रीचे कौशल्य आम्हाला मिळाल्याची माहिती सागवे शिरसे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील आंबा बागायतदार शेतकरी अमित शिर्सेकर यांनी दिली. शिर्सेकर म्हणाले की, पुण्याशिवाय आम्ही इतरत्रही स्वतःच विक्री करून ग्राहकांना खात्रीशीर आंबा उपलब्ध करून देत आहोत. कोकणात यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आंबा मोहर तुलनेने कमी होता.
मात्र, डिसेंबर ते जानेवारीमध्ये झालेली मोहरधारणा उत्तम असून, आंबा उत्पादन गतवर्षापेक्षा मुबलक येईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील शेतकर्यांकडे ग्राहकांची आंब्यासाठी सध्या थेट मागणी सुरू आहे. सध्या उच्च प्रतीच्या हापूसचा दर प्रतिडझनाला 800 ते 1200 रुपये आहे. 20 एप्रिलनंतर आंबा आवक वाढण्यास सुरुवात होईल आणि एप्रिलअखेर ती दुप्पट होऊन दर खाली येऊ शकतात.
हेही वाचा
एनपीए घसरणीचा दिलासा
वाहनचोरट्यांचं शहर! पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांची हवा..
Lok Sabha Election 2024 : पंजाबात भाजपा स्वबळावर
Latest Marathi News अनुकूल हवामानामुळे हापूस मुबलक.. Brought to You By : Bharat Live News Media.