कोकणात तीन मतदार संघांत लक्षवेधी लढती

कोकणात तीन मतदार संघांत लक्षवेधी लढती

शशी सावंत

कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कल्याण आणि रायगड या तीन लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदार संघात लक्ष्यवेधी लढती होत आहेत. सहा मतदार संघ असलेल्या कोकणातील जवळपास आठ मतदार संघात उमेदवार निश्चित झाले आहेत. रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामधून नारायण राणे यांचे नाव भाजपने निश्चित केले आहे. यापूर्वी ही जागा शिवसेनेला मिळेल, असे सांगितले जात होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यांनी नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी जाऊन आशीर्वादही घेतले होते. मात्र, शिवसेनेला विद्यमान खासदारांना तिकीट देणे भाग असल्याने ही जागा भाजपला दिली गेली आहे आणि नारायण राणे हे भाजपच्या यादीतील स्टार प्रचारक नितीन गडकरींप्रमाणेच उमेदवार असणार आहेत. (Lok Sabha Election 2024)
राणे विरुद्ध राऊ त हा वाद वर्षानुवर्षांचा आहे. त्यामुळे ही लढत आरोपांच्या फैरींमध्ये रंगणारी आणि राज्यात लक्ष्यवेधी ठरणारी चुरशीची लढत असणार आहे. राणेंना पूर्ण ताकद शिंदे यांच्या शिवसेनेने द्यावी, अशा सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही दिल्या आहेत. कोकणात यापूर्वी उत्तर मुंबईमधून केंद्रीय मंत्री पियूष गोयल, भिवंडीमधून पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील असे दोन मंत्री रिंगणात उतरले होते, आता राणे हे तिसरे मंत्री लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत. (Lok Sabha Election 2024)
यानंतरचा लक्ष्यवेधी ठरणारा लोकसभा मतदार संघ रायगड हा आहे. या मतदार संघात शिवसेनेच्या काही आमदारांनी विरोध करूनही तटकरेंचे नाव निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणाही केली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गीतेंचे नाव घोषित केले आहे. त्यामुळे या मतदार संघात तिसर्‍यांदा सुनील तटकरेंविरुद्ध अनंत गीते अशी लढत होत आहे. जय-पराजय हा आळीपाळीने या दोन्ही उमेदवारांनी अनुभवला आहे. 2014 मध्ये गीतेंनी सुनील तटकरेंचा पराभव केला होता, तर 2019 मध्ये सुनील तटकरे यांनी गीतेंचा पराभव केला होता. आता तिसर्‍यांदा होणार्‍या लढतीत जय कुणाचा आणि पराजय कुणाचा? याची उत्सुकता ताणलेली आहे. गीतेही माजी केंद्रीय मंत्री आहेत. तर सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची ठरणारी आहे. (Lok Sabha Election 2024)
तिसरा महत्त्वाचा लोकसभा मतदार संघ कल्याण हा आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर झाले नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेली दोन वर्षे श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदार संघात अधिक सक्रिय आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे हे कल्याणसाठीच आग्रही आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाई आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची नावे चर्चेत आहेत. दोन्हींपैकी कोणी उमेदवार दिला तरी मुख्यमंत्र्यांचा मुलगा रिंगणात असल्याने प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यावर पोलिस ठाण्यातच केलेला गोळीबार आणि त्यानंतर महेश गायकवाड यांच्यावर सहा कोटींच्या खंडणीचा दाखल झालेला गुन्हा, यामुळे शिवसेना भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आलेला हा भाग असल्याने या मतदार संघातील निवडणुकीकडे सर्वांचेच अधिक लक्ष आहे. याशिवाय दक्षिण मुंबईतील ठाकरे गटाचे माजी मंत्री अरविंद सावंत यांची उमेदवारी घोषित झाली असली, तरी महायुतीने आपला उमेदवार दिलेला नाही.
दक्षिण मध्यमध्ये शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार राहुल शेवाळेंची उमेदवारी जाहीर केली आहे. तर त्या विरोधात ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. तर गजानन किर्तीकर यांच्या उत्तर पश्चिम मतदार संघात शिवसेनेत झालेल्या गोविंदाच्या एंंट्रीमुळे मोठा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाने किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. आता त्या विरोधात शिवेसेनेकडून माजी खासदार, अभिनेते गोविंदा रिंगणात उतरणार आहेत. शिवसेनेने गजानन किर्तीकर आणि दुसरे इच्छुक रामदास कदम या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना चकवा देत गोविंदा यांनी एंट्री केल्याने महायुतीचा या मतदार संघावर प्रबळ दावा निर्माण झाला आहे. येथेही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे.
ठाणे मतदार संघ हा भाजपकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित असून, येथे डॉ. संजीव नाईक यांच्या नावाची निश्चिती करण्यात आली आहे. डॉ. संजीव नाईक हे माजी खासदार आहेत तसेच गणेश नाईक यांचे ते पुत्र आहेत. येथे नाईक विरुद्ध विचारे असा सामना रंगणार आहे. भिवंडीमध्ये कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश म्हात्रे आणि काँग्रेसच्या तिकिटासाठी प्रयत्न करणारे निलेश सांबरे हे तीन प्रमुख उमेदवार असणार आहेत.
पालघर लोकसभा मतदार संघात भाजपकडून डॉ. राजेंद्र गावित किंवा डॉ. विश्वास वळवी तर बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव किंवा आमदार राजेश पाटील यांची नावे चर्चेत असून, शिवसेना ठाकरे गटाने भारती कामडी यांना उमेदवारीसाठी सांगितले असले तरी अद्याप त्यांचे नाव जाहीर केलेले नाही. कोकणातील उमेदवारी जाहीर न झालेल्या चार मतदार संघात पालघरचा समावेश आहे. मावळमध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध सजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर झाली असून ,येथेही शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगणार आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही वाचा : 

सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीचीच शक्यता; काँग्रेस श्रेष्ठींवर दबाव
प्रकाश आंबेडकर तिसर्‍या आघाडीच्या तयारीत
मुंबईत एकाच जागेवर काँग्रेस नेत्यांच्या नजरा

Latest Marathi News कोकणात तीन मतदार संघांत लक्षवेधी लढती Brought to You By : Bharat Live News Media.